Wed, May 19, 2021 05:21
कोरोना रुग्ण चाचण्यांसाठी खासगी रुग्णालयांकडून लूट

Last Updated: May 05 2021 2:24AM

सातारा : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या उपचारासाठी दाखल होणार्‍या गंभीर रुग्णांच्या प्रकृतीची देखरेख कराव्या लागणार्‍या चाचण्यांच्या नावाखाली खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची लूट केली जात आहे. ज्या चाचण्या केवळ 4 ते 5 हजार रुपयांत होऊ शकतात, त्या चाचण्यांसाठी जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांकडून 8 हजारांपासून 16 हजार रुपये घेतले जात आहेत. या मनमानीमुळे सर्वसामान्य रुग्णांचे जगणे महाग झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या चाचण्यांचे दर नियंत्रित (कॅपिंग) करण्याची नितांत गरज आहे.

कोरोनामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू किंवा व्हेंटिलेटर उपचाराची आवश्यकता असते, कोरोनावरील उपचार घेत असताना संसर्ग किती आटोक्यात आला, संसर्ग किती झाला व रुग्णाच्या तब्येतीत किती सुधारणा झाली यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यामध्ये सीआरपी, एलडीएच, प्रोकॅलसिटोसीन, डी डायमर, फेरीटीन, 
इंटर लुकीन लेव्हल 6 या चाचण्यांचा समावेश आहे. 

या चाचण्या दर दिवशी किंवा दोन ते तीन दिवसांनंतर वारंवार कराव्या लागतात. मात्र, कोविड काळात या चाचण्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याने खासगी रूग्णालयांनी लूट सुरू केली आहे. या चाचण्यांचे दर दुप्पट ते तिप्पट करण्यात आले आहे. तर रूग्णालयाबाहेरील लॅबमध्ये हेच दर निम्म्यावर आहेत. शहरातील एका खासगी रुग्णालयाशी संलग्न असलेल्या प्रयोगशाळेने (लॅब) या चाचण्या करण्यास प्रतिदिन 15 ते 16 हजार रुपये आकारल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

मात्र, दुसर्‍या प्रयोगशाळेकडे याच चाचण्यांच्या दर निम्म्याच किमतीत म्हणजे 8 हजारांत होत आहेत.  रुग्णालयाबाहेर या चाचण्या पाठवण्याचे स्वातंत्र्य रुग्णाच्या नातेवाईकांना नसल्याने त्यांचा नाईलाज होत आहे. त्यामुळे संगनमताने ही लूट होते की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

शासनाने कोविड उपचारासाठी बेडचे दर नियंत्रित केले आहेत. साधारण बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडचे दर आणि सिटी स्कॅनचे दर नियंत्रित केले आहेत. पण, त्यामध्ये या चाचण्यांचा समावेश किंवा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी या बिलांची तपासणी केली तरी या चाचण्यांचे काय करायचे? किती पैसे घ्यावे याबाबत स्पष्टता नाही. म्हणून या चाचण्यांचे दर नव्याने नियंत्रित करण्याची गरज आहे.

कोरोना काळात एकीकडे संपूर्ण देशात वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली आहे. शासकीय रुग्णालये रात्रंदिवस रुग्णांना मोफत उपचार देत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही खासगी रुग्णालये नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेत सेवेबरोबरच धंदा करत असल्याचे दिसत आहे. या काळातही नफा कसा मिळेल हे पहिले जात आहे. मात्र, आपल्या रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत म्हणून नातेवाईक सहसा तक्रार करत नाहीत.