Mon, Sep 28, 2020 09:14होमपेज › Satara › प्रभागातील विरोधक होणार एकत्र

प्रभागातील विरोधक होणार एकत्र

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 9:58PMकराड : प्रतिभा राजे

स्वच्छता अभियानाचे विविध उपक्रम राबवल्यानंतर आता स्वच्छ  वॉर्ड स्पर्धेत प्रत्येक प्रभागामध्ये  नगरसेवकांची स्पर्धेत विजेते ठरण्यासाठी चुरस लागणार आहे. या स्पर्धेमुळे एकाच प्रभागात विरोधक म्हणून काम करणार्‍या नगरसेवकांनाही आता एकत्रित येवून प्रभागाच्या स्वच्छतेत जास्तीत जास्त काम करावे लागणार आहे. या स्पर्धेमुळे नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामुळे आपआपला प्रभाग स्वच्छ करण्यासाठी चुरस लागणार आहे. 

नगरविकास मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’  स्पर्धेत शहराने सहभाग घेतल्यामुळे कराड शहराचे चित्र सध्या स्वच्छ दिसत आहे. या अभियानाअंतर्गत कराड शहरात पालिकेने अनेक उपक्रम राबविले. अनेक संस्था, शाळा, संघटना यांचा सहभाग व प्रत्यक्ष  लोकसहभाग व श्रमदानातून स्वच्छता असा उपक्रम राबविला जात आहे. विविध कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आदींमध्ये स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविली जात आहे. नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करणे, फिडबॅक देणे आदी बाबी राबवल्यानंतर आता याचाचा पुढील भाग म्हणून शासनाकडून स्वच्छ वॉर्ड स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये नगरसेवकांनी स्वत:च्या प्रभागातील स्वच्छतेकडे लक्ष द्यायचे आहे. यामध्ये प्रत्येक वॉर्डसाठी एकूण 1500 मार्कांची परिक्षा असून यासाठी प्रथम क्रमांक 20 लाख, द्वितीय 15  लाख व तृतीय क्रमांक 10 लाख रूपये असे बक्षिस आहे.

पण यापेक्षाही विजय मिळवणे ही प्रतिष्ठा ठरणार असून यामुळे नगरसेवकांची स्वच्छतेसाठी चुरस लागणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहर सहभागी झाल्यापासून काही नगरसेवक, नगरसेविका यांनी उत्स्फुर्तपणे प्रत्येक स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला आहे. लोकशाही आघाडीने विरोधक असूनही स्वच्छतेचे बॅनर लावणे, श्रमदानामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेवून लोकसहभागही वाढवला आहे. मात्र ज्यांचा आजपर्यंत केवळ वरवरचा सहभाग होता त्यांना आता यामध्ये भाग घ्यावाच लागणार आहे. यासाठी काही नगरसेवकांनी आपाआपल्या आघाडीच्या मिटिंगा घेवून या स्पर्धेबाबत चर्चाही केल्याचे समजते. स्पर्धेत नगरसेवकांना त्यांच्या प्रभागाची माहिती विचारली जाणार आहे. यामध्ये कचर्‍याचे विलगीकरण, संकलन, कचरामुक्‍तीसाठी केले जाणार उपाय, शौचालयांची माहिती विचारली जाणार आहे. 

पूर्ण प्रभागाची महिती होणार

वॉर्ड स्पर्धेमुळे नगरसेवकांमध्ये एकीची भावना रूजु होईलच याबरोबरच नवीन नगरसेवकांना पूर्ण प्रभागाची माहिती होण्याचा फायदा या स्पर्धेमुळे होणार आहे. यावेळी कराड नगरपालिकेत बहुतेक नगरसेवक नवीन आहेत. सर्व नगरसेवकांना या स्पर्धेत उतरणे बंधनकारक आहे. त्यामुळे नगरसेवकांना वॉर्डच्या गल्‍लीबोळातीलही माहिती होणार असल्याने नागरिकांना त्यांच्या अन्य  समस्या नगरसेवकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवण्याची संधी मिळणार आहे.