Mon, Sep 28, 2020 07:43होमपेज › Satara › पाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट !

पाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट !

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 8:57PMतारळे : एकनाथ माळी

माळवाडी (बेंदवाडी ता . पाटण) येथे पाण्यासाठी लोकांचे हाल सुरु आहेत. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे गतवर्षी गावातील तरुणांनी निधी गोळा करुन बोअर काढली आहे. गेल्या दोन महिन्यापासून बोअरचे पाणी कमी झाले आहे. त्यामूळे सुमारे एक किलोमीटर अंतरावरुन डोक्यावरुन पाणी आणण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायत मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

कडवे बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत माळवाडी, सवारवाडी व बेंदवाडी या वाड्या असुन त्या डोंगरावर आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे तिथपर्यंत पोहचत नाहीत. लोकांना जीवनावश्यक असलेल्या पाण्याची मात्र अनेक वर्षांपासून परवड सुरु आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची एक दोन भांडी मिळत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी एक किलोमीटर डोंगार उतरुन पाणी घेऊन डोंगर पुन्हा चढावा लागतो. यामध्ये लहान मुलांनाही पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.

पंचवीस, तीस वर्षापुर्वीची तिन्ही वाड्यांसाठी ग्रॅव्हिटीचे लोखंडी पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यात येत होता. कालांतराने ती पाइपलाईन आडगळीत पडली. त्यानंतर ग्रामपंचायतीने नवीन योजना मंजूर केली. नवीन पाईपलाईन जमिनीखाली पुरुन आणणे गरजेचे होते. ठेकेदाराला हाताशी धरुन चुकीची पाईपलाईन केल्याने त्यातून वापरण्यायोग्य पाणी मिळत नव्हते. त्यामुळे तीन वर्षापासून तीही योजना अडगळीत पडली आहे.त्या योजनेतून ठेकेदाराची व काही मंडळींनी स्वत:ची मात्र चांदी करुन घेतल्याचा आरोप होत आहे.

ग्रामपंचायत कानाडोळा करत असल्याने माळवाडी येथील काही तरुणांनी पुढाकार घेऊन गतवर्षी  बोअर मारली. सुमारे दोन महिन्यापासून ते पाणीही कमी होऊ लागले आहे. आठ दहा दिवसात पाणी पातळी खालावणार असल्याने लोकांसमोर मोठे संकट उभे राहीले आहे. त्यामुळे आता तरी ग्रामपंचायतीने हालचाल करुन लोकांची परवड थांबाविण्याची मागणी करण्यात येत आहे.बोअरचे पाणी कमी झाल्याने लहान मुलांच्या डोक्यावरही कळशा देऊन एक-दीड किलोमीटरची पायपीट सुरु आहे. तर बोअरच्या पाण्यासाठी दिवसभर भांडी नंबरला ठेऊन पिण्याचे पाणी मिळवावे लागत आहे. यामध्ये मुलांची व वृध्दांचीही फरपट होत आहे. आता पंधरा दिवसांनी होणार काय? असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर लोकप्रतिनिही पाण्याच्या प्रश्‍नाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज गामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

 

Tags : satara, Tarale news, water, water problem,