Mon, Apr 12, 2021 04:13
साठा संपला; लसीकरण थांबले

Last Updated: Apr 08 2021 2:05AM

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतानाच आता कोरोना लसीकरणाचा जिल्ह्यातील साठा संपला आहे. त्यामुळे लसीचा पुढील स्टॉक उपलब्ध होईपर्यंत लसीकरणाला ब्रेक मिळणार आहे. प्रशासनाकडून याबाबत अधिकृतपणे लसीकरण मोहीम थांबवल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंद्रांमध्ये 45 वर्षांवरील सरसकट व्यक्तींना कोरोना लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. या लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून एका आठवड्यात तब्बल 90 हजार 136 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेरपर्यंत जिल्ह्यात 2 लाख 56 हजार 434 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.सातारा जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सरसकट नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले आहे. सातारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय,  प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खाजगी रूग्णालयात कोरोना लसीकरण सुरू आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू  लागला आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या लसीकरण केंद्रावर लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. दि. 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सरसकट व्यक्तींना लसीकरण केले जात असून आठवड्याच्या कालावधीत तब्बल 90 हजार 136 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. दि. 1 एप्रिल 8504, दि. 2 एप्रिल 6202, दि.3 एप्रिल 12731, दि. 4 एप्रिल 9296, दि. 5 एप्रिल 21397, दि. 6 एप्रिल 27217 असे लसीकरण झाले आहे. दि. 1 मार्चपासून आजअखेर पर्यंत जिल्ह्यात 2 लाख 56 हजार 434 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोराना लसीचा शासकीय कोटा संपला असून उर्वरीत नागरिकांना लसीकरणाचा स्टॉक उपलब्ध होईपर्यंत लसीकरणासाठी थांबावे लागणार आहे.

जिल्ह्यात 922 बाधित; पाच मृत्यू

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधितांच्या आकड्याचा विस्फोट होत आहे. जिल्हावासीयांच्या हलगर्जीपणामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. सहा महिन्यांनंतर एकाच दिवसात तब्बल 922 बाधित आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. 5 जणांचा बळी गेला असून बुधवारी 294 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. समूह संसर्गामुळे बाधितांच्या आकड्यासह दररोज बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑक्टोबरनंतर कमी झालेला कोरोनाबाधितांचा आकडा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते आजपर्यंत वाढतच चालला आहे. जिल्ह्यात प्रशासनाने घातलेले निर्बंध डावलून अनेकजण रस्त्यावर दिसत आहेत.  गेल्या आठवडाभरात कोरोनाचा रुग्ण  700 च्या घरात आढळत होते. मात्र बुधवारी 922 जणांचे अहवाल बाधित आल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच फलटण, सातारा आणि कराड या तीन तालुक्यात 100 पेक्षा अधिक बाधित आढळले आहेत. दिवसेंदिवस पॉझिटिव्हिटी रेट वाढत चालला असल्याने एकप्रकारे चिंता वाढू लागली आहे.
बुधवारी आढळलेल्या बाधितांमध्ये सातारा तालुक्यात 125, कराड 139, पाटण 19, फलटण 155, खटाव 81, माण 16, कोरेगाव 16, खंडाळा 94, वाई 83, महाबळेश्वर 56, जावली 33,

इतर 77 बाधित आढळले आहेत. याचबरोबर फलटण येथील 45 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 50 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील शेणोली येथील 70 वर्षीय वृद्ध, धावडवाडी ता. आटपाडी येथील 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.