Sat, Aug 08, 2020 14:02होमपेज › Satara › आंदोलक महिलांची कळंब्यात रवानगी 

आंदोलक महिलांची कळंब्यात रवानगी 

Published On: Aug 21 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 10:53PMकुडाळ : इम्तियाज मुजावर

कामावरून काढले म्हणून 13 महिला कर्मचार्‍यांनी खंडाळा तालुक्यातील धावडवाडी येथील हायटेक कंपनीच्या विरोधात आंदोलन केले होते.  यावर कंपनीनेच महिलांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर या महिलांना आता कळंबा जेलमध्ये टाकण्यात आले आहे. या महिलांनी कोणाचा खून केला, कोणाच्या घरावर दरोडा टाकला की त्यांना मोक्‍का लागला म्हणून त्यांची रवानगी कळंब्यात केली? असा प्रश्‍न उपस्थित होत असून महिला कर्मचार्‍यांचे नातेवाईक आणि लेकरं ‘आमच्या आईला कुणी तरी न्याय द्या’ अशी आर्त हाक देत आहेत. 

हायटेक कंपनीच्या मॅनेजमेंटने, पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत साटेलोटे करून आंदोलक महिलांनाच गुन्हेगार करून त्यांची कळंबा जेलमध्ये रवानगी केली आहे. या जेलमध्ये  खून, दरोडा, मोक्‍का यासह मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना ठेवले जाते. या महिलांनी तर पोटाची खळगी भरण्याचे काम देण्यासाठी आंदोलन केले होते. त्यामुळे या महिला इतक्या मोठ्या आरोपी झाल्या की त्यांची थेट कळंब्यात रवानगी केली? त्यामुळे वाह रे तेरा राज, वाह सरकार अशी म्हणायची वेळ सामान्यांवर आली आहे. 

या महिलांवर अन्याय होत असतानाही पोलिस आणि लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे खंडाळ्यात कंपनीच्या बोटावर चालणारे पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधी खरंच अस्तित्वात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.  थेट कळंब्यात या महिलांची रवानगी केल्यानंतर तालुक्यात संतप्‍त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

जागा आम्ही दिल्यानंतर तुमच्या कंपन्या उभ्या राहिल्या. त्यामुळे स्थानिकांना रोजगार देणे हे कंपन्यांना बंधनकारक आहे. असे असताना अचानक कामावरून काढून टाकून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणे हे किती मोठे धाडस म्हणावे लागेल. याला पोलिसांचे व लोकप्रतिनिधींचेही तितकेच बळ असल्याने कंपन्या मुजोर झाल्या आहे. मात्र, तालुक्यात आता सर्वसामान्यांना कोणी वालीच राहिला नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे.

एकंदरीत त्या महिलांचे संसार आता उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. त्या गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कळंबा जेलच्या गजाआड असल्याने घरातील लोकांचे मानसिक संतुलन बिघडण्याची वेळ आली आहे. महिलांची लहान-लहान बालके, माझी आई कधी येणार? अशा केविलवाण्या स्वरात घरातील कुटुंबियांना विचारत आहेत.  लढाई लढावी तर मर्दाशी मात्र हायटेक कंपनीने महिलांशी लढाई करून नेमकं काय साध्य केलं? असा सवाल अनेकजण विचारू लागले आहेत. 

दरम्यान, खंडाळा तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी व सेटलमेंट भाई कंपनीच्या अन्यायकारक धोरणाबाबत काही बोलायचे नाही, म्हणून आधीच आपले खिसे गरम करून खंडाळ्याच्या उजाड माळरानाच्या कानाकोपर्‍यात हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. तालुक्यातील आया बहिणींवर अन्याय होत असताना उजाड डोळ्याने पाहत आहेत. कंपनीची निर्मिती होत असताना हे स्थानिक गावटगे आणि स्वयंघोषित नेत्यांनी स्थानिक भूमिपुत्र व शेतकर्‍यांकडून  कोणताही त्रास होणार नाही व अन्याय ग्रस्तांकडून कुठलाही आवाज उठवला जाणार नाही यांच्या सुपार्‍या अनेक वेळा घेतल्या होत्या. मात्र हायटेक कंपनीकडून महिलांवर अन्याय होऊन देखील पांढर्‍या कपड्यात खंडाळा तालुक्यात गावभर फिरणार्‍या व कंपनीची चौकीदारी करून मागच्या दाराने पैसे कमावणार्‍या गावटगे व नेत्यांबाबत खंडाळा तालुक्यात छिथू होऊ लागले आहे.