सातारा : प्रतिनिधी
छत्रपती घराण्यातील दोन्ही राजे आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीला चांगले वाटले. मग, आता ते आमच्याकडे आले की त्यांच्या नावाने शंख का करत आहात? छत्रपतींच्या घराण्याच्या नावावर तुम्ही आजपर्यंत खूप काही मिळवले. मात्र, छत्रपतींच्या घराण्याला तुम्ही काय दिले? दोन्ही राजांनी तुमच्याकडे काही मागितले नाही. तुम्ही मात्र त्यांच्यावर अन्याय केला. हे घराणं देणारं आहे, घेणारं नाही हे लक्षात ठेवा. छत्रपतींच्या घराण्यावर बोलाल, तर राज्यातील जनता तुम्हाला जागा दाखवेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. दरम्यान, उदयनराजे व शिवेंद्रराजे हे छत्रपती आहेत, मी मावळा आहे. त्यांनी मागण्या करायच्या नाहीत. त्यांनी आम्हाला आदेश द्यायचा. यापुढे दोन्ही राजे सांगतील ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सातार्यासाठी छप्पर फाडके घोषणांची बरसात केली.
भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा सातार्यात आली तेव्हा सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर आयोजित केलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, श्री. छ. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, मंत्री बाळा भेगडे, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, ना. नरेंद्र पाटील, ना. शेखर चरेगावकर, दीपक पवार, कांताताई नलावडे, खा. संजय काकडे, मदनदादा भोसले, विक्रम पावसकर, जयकुमार गोरे, मनोज घोरपडे, डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, महेश शिंदे, अशोक गायकवाड यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, आज माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे. यापूर्वी अनेकदा राजे माझ्यासोबत मंचावर दिसले. मात्र, ते आमच्या पक्षाच्या मंचावर नसायचे. आता आमचे राजे आमच्या मंचावर उपस्थित आहेत, याचा मला अभिमान वाटतो. सातार्याच्या जनतेने या महाजनादेश यात्रेचे जे स्वागत केले आहे त्याबद्दल या जनतेचा मी आभारी आहे.
प्रजासुद्धा राजा असते. आमच्या या राजासमोर विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी मी समोर आलो आहे. उदयनराजे व शिवेंद्रराजे आमच्या सोबत आल्याने निकाल ठरला आहे. आता समोर पैलवानच उरलेला नाही. आता कोणी तेल लावायला तयार नाही, आता कोणी गोद्यात उतरायला तयार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्षात असताना आम्ही संघर्ष यात्रा काढतो अन् सत्तेत असताना संवाद यात्रा काढतो. ही संवादाची यात्रा आहे. नव्या दमाने सरकार आणून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करायचे आहे, यासाठी ही महाजनादेश यात्रा काढली आहे. शेतकर्यांना 5 वर्षांत 50 हजार कोटी दिले. युतीचे सरकार आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पांना पैसे मिळाले. गेल्या 15 वर्षांत प्रकल्प रखडले. परंतु, पुन्हा सत्ता आल्यानंतर हजारो कोटी रूपये देवून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला आहे. हा जिल्हा दक्षिण भारताला पाणी देतो. मात्र, काही भाग कायम दुष्काळी असा ठपका आहे. आता कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात देवून हा ठपका पुसायचा आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी अनेकदा उदयनराजे व शिवेंद्रराजे आमच्याकडे यायचे तेव्हाही ते विरोधात असतानाही आम्ही त्यांची कामे करत होतो. सातारा जिल्ह्यात जी काही विकासकामे झाली आहेत ती त्यांच्या पाठपुराव्यामुळेच झाली आहेत. नगरपालिका हद्दीतील बेघरांना प्रधानमंत्री आवासमधून घरे देवून सातारा जिल्हा व महाराष्ट्र बेघरमुक्त करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
उदयनराजे व शिवेंद्रराजे या दोघांनीही आपणाकडे वैयक्तिक कामांची यादी कधी दिली नाही.जी यादी दिली ती सातारा जिल्ह्याच्या विकासाची दिली, तरीही दोन्ही राजांवर बोलले जाते. उदयनराजे व शिवेंद्रराजेंवर जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर जनता उत्तर देईल. आजपर्यंत दोन्ही राजे तुमच्याकडे होते तेव्हा ते तुम्हाला चांगले वाटत होते. आता आमच्याकडे आले की त्यांच्यावर बोलत आहात. छत्रपतींच्या घराण्याचे नाव घेवून आजवर भरपूर मिळवले. या घराण्याने कधीच काही तुम्हाला मागितले नाही. हे घराणे देणारे आहे घेणारे नाही. तुम्ही मात्र त्यांच्यावर अन्याय केला. आता छत्रपतींच्या घराण्यावर बोलाल तर महाराष्ट्रातील जनता तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
लोकसभेची निवडणूक विधानसभेबरोबरच होणार आहे. आजपर्यंतच्या सर्वाधिक मतांनी उदयनराजेंना निवडून आणायचे आहे. त्याचबरोबर सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजेंनाही विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन करुन मुख्यमंत्री म्हणाले, दोन्ही राजेंनी सातार्याच्या हद्दवाढीचा प्रश्न मांडला. फाईल जर पूर्ण असेल तर उद्याच सही करून हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढतो. मेडिकल कॉलेजला जागा दिली आहे. यावर्षी मेडिकल कॉलेजचे प्रवेश सुरू करू. पुढील तीन वर्षांत अप्रतिम इमारत बांधू. बारामतीला मेडिकल कॉलेज झाले. मात्र, त्यासाठी भाजपने 500 कोटी दिले. अन्य कोणीही दिले नाही. जिल्ह्यात चांगले मेडिकल कॉलेज केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सातार्याच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी 50 कोटी देण्याची घोषणा करतो. सातार्यासाठी जे जे मागाल ते ते दिल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला.
उदयनराजे, शिवेंद्रराजे भाजपमध्ये आले असून आपला मान सन्मान कधीही कमी होवू देणार नाही. तुम्ही दिलेली सर्व कामे केल्याशिवाय शांत राहणार नाही. आपला जनादेश हाच आशीर्वाद समजून विधानसभेवर झेंडा फडकवू आणि पुन्हा छत्रपतींचे आशीर्वाद घेण्यासाठी सातार्यात येवू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्यासह सर्व नगरसेवक, जि. प., पं. स. सदस्य व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
उदयनराजेंकडून पगडी, तर शिवेंद्रराजेंकडून तलवार
मुख्यमंत्री फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना उदयनराजेंनी पगडी घातली, तर शिवेंद्रराजेंनी त्यांच्या हातात तलवार दिली. याचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले, उदयनराजेंनी मला पगडी घातली, तर शिवेंद्रराजेंनी मला तलवार देऊन माझे स्वागत केले. उदयनराजे व शिवेंद्रराजे यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासाची मागणी केली आहे. छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत. आदेश द्यायचा असतो. जेव्हा मावळा चांगली कामगिरी बजावायचा तेव्हा महाराज त्याला पगडी घालायचे. आज तुम्ही मला पगडी घातली आहे. तलवार दिली आहे. त्यामुळे छत्रपतींचा हा मावळा छत्रपतींचे सर्व आदेश मानणार आहे. तुम्ही सांगितलेली सर्व कामे करणार आहे. शिवेंद्रराजेंनी दिलेल्या यादीतील मंजुरीच्या सर्व घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.