Thu, Oct 01, 2020 17:54होमपेज › Satara › मी माझ्या कार्यकर्त्यांबरोबरच  : आ. शिवेंद्रराजे

मी माझ्या कार्यकर्त्यांबरोबरच  : आ. शिवेंद्रराजे

Published On: Feb 19 2019 1:15AM | Last Updated: Feb 19 2019 1:15AM
सातारा : प्रतिनिधी

खा. उदयनराजे भोसले व माझ्यात अनेकवेळा संघर्ष झाला आहे. या संघर्षात कार्यकर्ते बळी पडले आहेत. कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला आहे. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांबरोबरच राहणार असल्याची भूमिका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सोमवारी स्पष्ट केली.  कार्यकर्त्यांच्या भावना आपण पक्ष श्रेष्ठींकडे कळवू, असेही आ. शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. 

सातारा लोकसभेची उमेदवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना देण्यावरून सातारा  व जावली तालुक्यातील आ. शिवेंद्रराजे  गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवरच काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची भेट घेऊन खा. उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. यानंतर सातारा तालुक्यातील जि.प. व पंचायत समिती सदस्यांनी बैठक घेऊन काहीही झाले तरी खा. उदयनराजे भोसले यांचे काम करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत आ. शिवेंद्रराजे भोसले यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, मी 2-3 दिवस सातार्‍यामध्ये नव्हतो. माझ्या कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये जावून खा. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बैठक झाली. शेवटी माझे राजकारण हे कार्यकर्त्यांबरोबर आहे. मला कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या शंका समजून घ्याव्या लागतील. त्याप्रमाणे खा. शरद पवार आम्हाला ज्यावेळी विचारतील त्यावेळी  खा. पवार साहेबांजवळ कार्यकर्त्यांचे मत स्पष्ट करणार आहे.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, माझे कार्यकर्ते कधीही दुसर्‍यांकडे विकासकामे मागायला जात नाहीत आणि मी जावूही देत नाही. त्यांच्या भागातील, त्यांच्या वॉर्डातील विकासकामे मी रेटून करतो. वेगवेगळ्या माध्यमातून त्यात डीपीडीसी व इतर माध्यमातून फंड दिला जातो. माझा कार्यकर्ता हा दुसर्‍याच्या दारात गेला नाही पाहिजे, ही माझी भूमिका आहे. त्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवलायं म्हणजे मला त्यांचं काम करणं भाग आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मीच सहजरित्या सुरळीत करून दिले पाहिजे. राहिला प्रश्‍न एकच आमच्या दोघांमध्ये अनेक वेळेला संघर्ष झालेला आहे. कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेवू, अशी ग्वाही आ. शिवेंद्रराजे यांनी दिली.