Fri, Oct 02, 2020 01:32होमपेज › Satara › पावसात काम केल्यानेच स्लॅब खचला

पावसात काम केल्यानेच स्लॅब खचला

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:11PM

बुकमार्क करा
कोडोली : वार्ताहर

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप चौकातील उड्डाणपुलाच्या स्लॅबला सुमारे 100 फूट लांब व 3 इंच रूंदीची भेग पडली असून 3 ते 4 इंच हा स्लॅब निखळला आहे.  खचलेल्या या भागाची गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) अधिकार्‍यांनी पाहणी केली असून उड्डाणपुलावरील कोल्हापूरच्या दिशेने जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. दरम्यान, भर पावसात काम केल्याने त्याचवेळी हा पूल थोडा खचला होता.

संभाजीनगरच्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला याबाबत त्याचवेळी निवेदनही दिले होते. त्यानंतरही प्राधिकरणाने हे काम रेटून नेल्यामुळेच स्लॅब खचल्याचा आरोप  स्थानिकांनी केला आहे. शिवराज पेट्रोल पंप चौकातील अडीच महिन्यांपूर्वी उभारलेल्या उड्डाणपुलाला बुधवारी सायंकाळी तडा गेल्याने हा पूल खचला.  गुरुवारी सकाळी जि.प. सदस्य, संभाजीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी संबंधित भागाची पाहणी केली.

या पाहणीत पुलाच्या स्लॅबला  100 फूट लांब व 3 इंच रूंदीची भेग पडली असून 3 ते 4 इंच हा स्लॅब खाली आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भर पावसाळ्यात रिलायन्सने या उड्डाणपुलाचा स्लॅब टाकला होता. पावसात स्लॅब टाकल्यानेच काम निकृष्ट होण्याची शक्यता होती. त्यामुळे संभाजीनगर, विलासपूर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. त्यानंतरही रिलायन्सने काम रेटून नेल्यामुळे आजची परिस्थिती उद्भवली. स्लॅब टाकतेवेळीच पूल खचला होता, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.  

संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या बैठकीत पुलाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच दीपाली पंडित, उपसरपंच सुभाष मगर व सदस्यांनी दिली. 

महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांकडून पाहणी

शिवराज पेट्रोल पंपाशेजारील खचलेल्या उड्डाणपुलाची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी पोतदार यांनी गुरुवारी दुपारी केली. यावेळी त्यांनी उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यास सांगितले असून याबाबत सातारा शहर पोलिस स्टेशनलाही त्याबाबतची माहिती दिली. पाहणीवेळी पुणे येथील स्पेशल कन्सल्टन सूर्यवंशी, जहा, आय.टी.डी. कंपनीचे अधिकारी बी.के. सिंग, स्ट्रक्‍चर हेडप्रमुख दत्तात्रय चोपडे, शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.