Fri, Oct 02, 2020 01:30होमपेज › Satara › परप्रांतीयांबाबत निर्णय घ्या अन्यथा त्यांना हद्दपार करू : मनसेचा इशारा

परप्रांतीयांबाबत निर्णय घ्या अन्यथा त्यांना हद्दपार करू : मनसेचा इशारा

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 10:56PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्यात परप्रांतीयांची मुजोरी वाढली असून माताभगिनींच्या छेडछाडीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने परप्रांतीयाबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा येत्या 8 दिवसात परप्रांतियांना जिल्ह्यातून हद्दपार करू, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, धैर्यशील पाटील व युवराज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

धैर्यशील पाटील म्हणाले, कोडोली एमआयडीसी येथे एका परप्रांतियाने मुलीची छेडछाड केली असून याबाबत संबंधित इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र, अशा घटनांमुळे जिल्ह्यातील माताभगिनींची सुरक्षा धोक्यात आली आहे.  परप्रांतीयांकडून असे प्रकार घडत असतील तर मनसे कदापीही सहन करणार नाही. परप्रांतीयांकडे कोणताही रहिवासी असल्याचा पुरावा नसताना घरमालकांनी त्याची कोणतीही खातरजमा न करता त्यांना खोल्या भाड्याने दिल्या आहेत. अशा घरमालकांवर गुन्हे दाखल करावेत.

अ‍ॅड. विकास पवार म्हणाले, परप्रांतीयांकडे कोणतेही रेकॉर्ड नाही. त्यांना बी रोल हा फॉर्म भरल्याशिवाय कोठेही वास्तव्य करता येत नाही मात्र, जिल्ह्यात  पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भाड्याने रहात आहेत. प्रशासनाने या परप्रांतीयांचे  लाड बंद करावेत अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर मनसेतर्फे दिले जाईल.

शहराध्यक्ष राहूल पवार म्हणाले, अनेक परप्रांतीय गुन्हे करून महाराष्ट्रात आश्रयासाठी येत असतात.बहुतांश परप्रांतीयाकडे कोणताही रहिवाशी पुरावा नसतो.

युवराज पवार म्हणाले, सातारा शहरासह जिल्ह्यातील परप्रांतीयांची घरमालकांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली नाही, अशा घरमालकांवर पोलिस  प्रशासनाने कारवाई करावी. 8 दिवसात परप्रांतीयांबाबत जिल्हा प्रशासनामार्फत योग्य तो निर्णय न घेतल्यास परप्रांतीयांना मनसे स्टाईलने जिल्ह्यातून हद्दपार करू. यावेळी राजेंद्र केंजळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.