Mon, Jan 18, 2021 18:27
प्रतीक्षा संपली; लस दाखल

Last Updated: Jan 13 2021 11:46PM
सातारा : प्रवीण शिंगटे

सिरम इन्स्टिट्यूटकडून देशभर कोरोना लसीचे वितरण सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यासाठी मंगळवारी पहाटे 30 हजार डोस घेऊन कोल्ड व्हॅन सातार्‍यात आली. आरोग्य खात्याच्या साठवणूक केंद्रात या लसीचे डोस सुरक्षितपणे ठेवण्यात आले. आता तेथून जिल्ह्यातील लसीकरण केंद्रात ते वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे सातारकरांची लसीची प्रतीक्षा संपली असून, शनिवारपासून 11 केंद्रांवर प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

सिरमकडून मंगळवारी पहाटे देशभर लस पोहोचवणारे कंटेनर व कोल्ड व्हॅन बाहेर पडले. गेल्यावर्षी कोरोनाचा विषाणू आढळल्यापासून लस कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. केंद्र शासनाने कोणत्या ठिकाणी किती लस पाठवायची याची यादी सिरमला दिली होती. नॅशनल कोल्डचेन रिसोर्सेस सेंटर येथून ही लस राज्यभरात वितरित करण्यात आली. 

सातारा व सांगलीसाठी लस  मंगळवारी पहाटेच्या सुमारास पोहोचली. त्यामुळे सातारकरांची लसीची प्रतीक्षा संपली आहे. कोव्हिड अ‍ॅपवर ज्या कर्मचार्‍यांनी नोंदणी केली आहे. त्यांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील 4 हजार 417, फलटण 1 हजार 963, माण 1 हजार 406,  पाटण 1 हजार 732, कोरेगाव 1 हजार 568, महाबळेश्‍वर 715, वाई 1 हजार 483, खंडाळा 909, खटाव 1 हजार 620, कराड 7 हजार 693, जावली 904 असे मिळून 24 हजार 410 जण लसीकरणाचे लाभार्थी आहेत. आरोग्य सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी निवडक  प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर किमान 100 जणांना लसीकरण देण्यात येणार आहे.

लसीकरणासाठीच्या पथकामध्ये 5 सदस्यांचा समावेश राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली. लस देण्यासाठी सुमारे 434 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली असून, त्यांना आरोग्य विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

लसीकरण प्रक्रिया सुरक्षित : डॉ. अनिरुद्ध आठल्ये

लसीकरणासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाने 16 ठिकाणे निश्‍चित केली होती. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला असून, 11 ठिकाणीच प्रत्यक्ष लसीकरण होणार आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कराड व फलटण, ग्रामीण रुग्णालय पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, कृष्णा मेडिकल कॉलेज व  हॉस्पिटल कराड, मायणी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मायणी (ता. खटाव), मिशन हॉस्पिटल वाई, प्राथमिक आरोग्य केंद्र नागठाणे या केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरक्षितपणे होणार असल्याची माहिती डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.