Tue, Sep 29, 2020 10:22होमपेज › Satara › हुल्लडबाजांना आवर घालण्यासाठी पोलिस सज्ज 

‘थर्टी फर्स्ट’साठी चेकपोस्ट उभारणार

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 7:47PM

बुकमार्क करा
परळी : सोमनाथ राऊत

थर्टी फर्स्टचा आनंद, जल्लोष साजरा करण्यासाठी अवघी तरुणाई तयारीत असली तरी आता त्यांच्यावर पोलिस यंत्रणेने कमालीचे निर्बंध लादले आहेत. सातारा तालुक्यातील कण्हेर धरण, उरमोडी, ठोसेघर धबधबा, बोगदा या परिसरात पोलिस चेक पोस्ट उभारण्यात येणार असून हुल्लडबाजांना पायबंद घातला जाणार आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही पोलिसांनी दिली आहे. 

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने गत काही वर्षांपासून कास पठार, ठोसेघर, बामणोली येथील वन खात्याच्या परिसरात अति उत्साही तरुण येत असतात. वनक्षेत्राचे वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र, हे महाभाग अनेकदा नुकसान पोहोचवत आहेत. थर्टी फर्स्टच्या एक दिवस अगोदरच देशी- विदेशी दुकाने  हाऊसफुल्ल असतात. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह गाडीमध्ये मोठ्या आवाजात टेप लावणे, सार्वजनिक ठिकाणी गोंगाट करणे, वन खात्याच्या जागेत वाहन नेणे, खाद्यपदार्थ, ज्वाला ग्रहीत पदार्थ नेणे, टेपरेकॉर्ड लावणे आदी प्रकार होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात येणार आहेत.

नववर्षाचे स्वागत करण्याच्या नावाखाली दारुचा महापूर वाहत असून हॉटेल, बार, वॉईनशॉप चालकांची चांगलीच चलती होत आहे. हॉटेलमध्ये तर 31 डिसेंबरच्या रात्री पाय ठेवायला जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण निसर्गसानिध्यात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जातात. मात्र तेथे धिंगाणा घातला जात असून पर्यावरणाचीही हानी केली जात असल्याने यावर्षी तरी त्यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

दरम्यान, आर्ट ऑफ  लिव्हिंग मार्फत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी हॅपीनेस प्रोगॅ्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आसने, ध्यान, प्राणायाम आणि सुदर्शन क्रीया यांंचा समावेश आहे. 31 डिसेंबर म्हटलं गोंगाट अन् विभत्सपणा या गोष्टी  वाढू लागल्या आहेत.हे टाळण्यासाठी हे शिबिर आयोजित केल्याची माहिती भावना शहा यांनी दिली. 

दारू नको, दूध प्या...

परिवर्तन व्यसनमुक्‍ती संस्थेच्यावतीने राज्यभर तसेच सातारा जिल्ह्यात जनजागृती सुरू आहे. ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम राबवण्यात येत असून थर्टी फर्स्टच्या रात्री युवा वर्गाने स्वच्छता अभियान, व्यसनमुक्‍ती यासारखे विधायक उपक्रम राबवावेत याचे नियोजन केले जात आहे. याबाबतची माहिती परिवर्तन व्यसनमुक्‍ती संस्थेचे किशोर काळोखे यांनी दिली.