Fri, Feb 26, 2021 07:23
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 26 हॉटस्पॉट

Last Updated: Feb 23 2021 11:44PM

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात कोरेगाव, माण, खटाव व सातारा तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढू लागली असल्याने आरोग्य विभागामार्फत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 26 नवे हॉटस्पॉट तयार झाले असल्याने त्याठिकाणी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.त्यासाठी नागरिकांचे सहकार्यही तितकेच आवश्यक ठरणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. खटाव तालुक्यातील मांडवे,  वडूज, कातरखटाव, पळसगाव, येरळवाडी, निमसोड, मायणी, नेर  तर सातारा तालुक्यात मंगळवार पेठ, संभाजीनगर, सदरबझार, कोडोली, आशाभवन, खोजेवाडी, पानमळेवाडी. कोरेगाव तालुक्यात आशाग्राम वाघजाईवाडी, कोरेगाव, एकंबे, सासुर्वे, रहिमतपूर. माण तालुक्यात पळशी, दहिवडी, वाई तालुक्यात बावधन, खंडाळा तालुक्यात लोणंद, महाबळेश्वर तालुक्यात खिंगर व भिलार हे कोरोनाचे नव्याने हॉटस्पॉट झाले आहेत. या ठिकाणी 1 ते 22 फेब्रुवारी अखेर कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

या सर्वच ठिकाणी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे.त्यासाठी लोकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्या ठिकाणी बाजारपेठा आहेत या बाजारपेठांमध्ये नागरिक तोंडाला मास्क न वापरताच फिरताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतूनच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिक ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असली तरी पण ते अंगावर  काढत आहेत.

नागरिकांनी आजार अंगावर काढू नये. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही ताप, सर्दी अशी लक्षणे असणार्‍या रुग्णांना शासनच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत टेस्टींग करुन घ्यावे.लोकांनी घरगुती उपचार करु नयेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी केले आहे.

चाचणीला विरोध नको...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आरटीपीसीआर तपासणी मोहिम युध्दपातळीवर राबवली आहे. मात्र जावली तालुक्यात एक शाळकरी मुलगी कोरोना बाधित आढळून आली होती. तिच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेण्यास गेलेल्या पथकाला त्या कुटुंबाने विरोध दर्शवला. असा विरोध कोणीही करु नये. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना योग्य त्या उपाययोजनांसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना आजाराची लक्षणे असल्यास त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी