Wed, Jun 23, 2021 01:36होमपेज › Sangli › ‘स्थायी’चे 767 कोटींचे ‘बिगबजेट’ महासभेकडे 

‘स्थायी’चे 767 कोटींचे ‘बिगबजेट’ महासभेकडे 

Published On: Jul 21 2019 1:26AM | Last Updated: Jul 21 2019 1:26AM
सांगली ः प्रतिनिधी 

सांमिकु महापालिकेचे 2019-20 चे स्थायी समितीचे 767 कोटी रुपयांचे बिगबजेट अंदाजपत्रक शनिवारी सभापती अजिंक्य पाटील यांनी महासभेत महापौर संगीता खोत यांच्याकडे सुपूर्द केले. 

महापालिकेत सत्ता परिवर्तनानंतर भाजपचे हे पहिलेच अंदाजपत्रक आहे. निम्मे वर्ष संपल्यानंतर ते महासभेकडे सादर झाले आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोणीतही करवाढ नसलेला विविध विकासाभिमुख योजना, प्रकल्पांचा हा विकाससंकल्प असल्याचा दावा पाटील यांनी केला. यात नदी शुद्धीकरणासाठी नाल्यांवर नव्याने सहा एचटीपी केंद्रे उभारणे आणि अद्ययावत भाजी मंडईसह विविध विकासकामांचा समावेश आहे. 

अंदाजपत्रक सादर करण्यासाठी सभापती पाटील सांगलीवाडीतून समर्थकांसह विंटेज कारमधून महापालिकेत आले. सभेत त्यांनी हे अंदाजपत्रक महापौर खोत यांच्याकडे सादर केले. यावेळी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते युवराज बावडेकर, आयुक्‍त नितीन कापडनीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनद्दीन बागवान आदींसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. 

ते म्हणाले,  प्रशासनाने 750 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक दिले होते. त्यात सुधारणा करून 767 कोटी 6 लाख 28 हजार 190 रूपयांचे  अंदाजपत्रक केले आहे. सुमारे 24 लाख  79  हजार 176 रूपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. प्रभाग समित्या सक्षमीकरणासाठी प्रत्येकी 2 कोटी रुपयांची तरतूद सुचविली आहे. प्रत्येक निवडून आलेल्या व स्वीकृत सदस्यांना विकासासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. 

पाटील पुढे म्हणाले, महाआघाडीच्या सत्तेत शेरीनाला योजना राबविली. ते काम अद्याप  सुरूच आहे. आता धुळगावला सांडपाणी नेऊन सोडले तरी  ग्रामस्थांना ते शुद्ध करून शेतीच्या बांधापर्यंत देण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी खा. संजय पाटील यांनी नुकतीच  बैठक घेतली. मनपाचा हिस्सा म्हणून 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

ते पुढे म्हणाले, पाणीपुरवठा सक्षमीकरणाअंतर्गत आधुनिक मीटर्स बसविण्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या बिलांची आणि येणार्‍या पाण्याचीही मोजदाद अचूक होईल. ई टॉयलेटसाठी 1 कोटी, विस्तारीत भागात भाजी-फळ मार्केटसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

ते म्हणाले, महापालिकेचे अनेक खुले भूखंड पडून आहेत. त्यांना मनपाचे नाव लागलेले नाही. त्यावर अतिक्रमणे होत आहेत. त्याला रोख लावून मनपाच्या मालमत्ता वाचविण्यासाठी खुल्या भूखंडांना नावे लावणे, फलक लावणे आणि त्यांना विशिष्ट रंगांनी संरक्षक भिंती बांधता येतील. त्यामुळे महापालिकेचे भूखंड ओळखता येतील. शहरात चारही बाजूंनी येणार्‍या रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, सांगली, मिरजेत छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे उभारण्यासाठी 50 लाखांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. महापाालिकेचे धोकादायक अतिथीगृह पाडून ते बीओटी तत्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटींची तरतूद  केली आहे.  उत्पन्नवाढ करण्यासाठीही विविध उपाययोजना सूचवल्या आहेत. घरपट्टीतून वर्षाला 10 कोटींची उत्पन्नवाढ अपेक्षित आहे. 

दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी स्थायी समितीत चर्चेविना अंदाजपत्रक परस्पर अंतिम केल्याचा दावा केला. काँगे्रसचे मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, मनोज सरगर आदिंनी तर सभापतींनी परस्पर अंदाजपत्रक गुंडाळल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी स्थायी सभेत चर्चेने निर्णय झाला असेल तर त्याचे इतिवृत्त पुढील सभेस सादर करावे, अशी मागणी केली. महापौर खोत यांनी सदस्यांना अभ्यास करून चर्चेसाठी सर्वानुमते 23 जुलैपर्यंत सभा तहकूब केली. 

अंदाजपत्रकातील विशेष तरतुदी

शेरीनाला योजनेंतर्गत धूळगाव योजनेसाठी - 5 कोटी  * नदी प्रदूषणमुक्‍तीसाठी - 3 कोटी  * अद्ययावत पाणी मीटर पुरविणे - 1.50 कोटी  * मनपा शाळा सक्षमीकरण - 2 कोटी, भाजी-फळ मार्केट उभारणे - 1 कोटी * खुल्या भूखंडांना कंपाऊंड करणे - 1 कोटी * संभाजी महाराज यांचा पुतळा बसविणे - 50 लाख * अतिथीगृहाची जागा विकसित करणे - 1 कोटी  * रमाई उद्यानाचा विकास करणे - 1 कोटी  * मिरजेतील गणेश तलाव विकसित करणे - 1 कोटी  * प्रभाग समिती सक्षमीकरण निधी - 8 कोटी  * नगरसेवक-पदाधिकार्‍यांना - 22 कोटी  * शंभर कोटींसाठी मनपा हिस्सा - 10 कोटी * काळी खण विकसित करणे - 1 कोटी.