Tue, Aug 04, 2020 10:41होमपेज › Sangli › जिल्हा ‘सहाशे’पार; नवे 28 पॉझिटिव्ह

जिल्हा ‘सहाशे’पार; नवे 28 पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 11 2020 12:05AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात शुक्रवारी ‘कोरोना’चा सोळावा बळी गेला. नागठाणे (ता. पलूस) येथील 62 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान भारती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. शुक्रवारी नवे 28 रुग्ण आढळले. सांगलीतील 7, मिरज 3, दुधोंडी 6, नागज 1, येळापूर 1, उमदी 1, शिंदेवाडी 2 तसेच वाळवा तालुक्यातील 7 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. अथणी (कर्नाटक) येथील 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. कुरूंदवाड (जि. कोल्हापूर) येथील 4 व अथणी (जि. बेळगाव) येथील 2 व्यक्तींचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. 

जिल्ह्यात शुक्रवारअखेर एकूण कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 617 झाली आहे. त्यापैकी 298 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 303 व्यक्ती उपचाराखाली आहेत. त्यातील 12 व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शुक्रवारअखेर एकूण मृत व्यक्तींची संख्या 16 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

नागठाणे (ता. पलूस) येथील 62 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीवर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांचा (हृदय शस्त्रक्रियेनंतर) उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवे 10 रुग्ण आढळले. त्यापैकी 7 रुग्ण सांगलीतील आहेत. सांगलीतील चौगुले प्लॉट येथील 2 पुरूष व 2 महिला, गारपीर परिसर माने प्लॉट येथील 2 व्यक्ती, अरिहंत कॉलनी येथील एका व्यक्तीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. मिरजेतील रेवनी गल्लीतील दोन महिला आणि मंगळवार पेठेतील एका व्यक्तीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.  दुधोंडी (ता. पलूस) येथील बाधित व्यक्तींच्या संपर्कातील 6 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये चार पुरूष व दोन महिला आहेत. नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे मुंबईहून आलेल्या पोलिस कर्मचार्‍याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना नागज येथे शेतातील घरात क्वारंटाईन केले होते. त्यामुळे गावात कंटेनमेंट झोन करावा लागला नाही. 

शिंदेवाडी (ता. मिरज) येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 2 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. येळापूर (ता. शिराळा) येथील एका 34 वर्षीय पुरूषाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. उमदी (ता. जत) येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली. 

वाळवा तालुक्यातील 7 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये वाळवा येथील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील 4 व्यक्ती, इस्लामपूर येथील एक पुरूष व एक महिला आणि जुनेखेड येथील एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. 

जुनेखेड येथील व्यक्ती सांगलीत सावली बेघर केंद्रात होती. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ही व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने सावली बेघर केंद्रातील 57  व्यक्ती आणि 7 कर्मचार्‍यांना निवारा केंद्रातच क्वारंटाईन केले आहे, अशी माहिती सावली बेघर केंद्राचे चालक मुस्तफा मुजावर यांनी दिली. 

अथणीच्या दोन व्यक्तींचा मृत्यू

अथणी (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील दोन व्यक्तींचा शुक्रवारी मृत्यू झाला. मिरज येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी करूंदवाड (जि. कोल्हापूर येथील 3 पुरुष व 1 महिला, अथणी (जि. बेळगाव) येथील 63 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली.