Wed, Oct 28, 2020 10:26होमपेज › Sangli › तासगावमधील कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

तासगावमधील कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Last Updated: Sep 30 2020 1:52AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील गोटेवाडी रोड (ता. तासगाव) येथील राजेंद्र सोपान जाधव यांच्या मे. सुकमणी मल्टीकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकून ७ लाख ९७ हजार ९१० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. राजेंद्र जाधव यांचे गोटेवाडी रोड येथे सुकमणी मल्टीकेअर प्रा. लि. नावाने संजीवनी एन्झायम, डायमंड कॅप्सूल किट, एसटीपीएल ग्रोन, प्रोटीन कॉन्सन्ट्रेट इत्यादी निर्माण करण्याची कंपनी आहे.

या ठिकाणी वरील उत्पादनांमध्ये भेसळ होत असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार सहायक आयुक्त सु.आ.चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी कोळी, स्वामी व नमुना सहायक कवळे यांनी या ठिकाणी छापा टाकला. 

यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाची कोणतीही परवानगी न घेता, राजेंद्र जाधव यांनी मे. सुकमणी मल्टीकेअर प्रा. लि.च्या माध्यमातून संजीवनी एन्झायम, डायमंड कॅप्सूल किट, एसटीपीएल ग्रोन, प्रोटीन कॉन्सन्ट्रेट इत्यादी निर्मितीचा व्यवसाय सुरू केल्याचे आढळून आले.

तसेच या उत्पादनाच्या लेबलवर काही चुकीचा मजकूर छापला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यामधील काही नमुने तपासणीसाठी घेऊन ७ लाख ९७ हजार ९१० रुपये किंमतीचा सर्व साठा जप्त केला आहे. तसेच जाधव यांना व्यवसाय बंद करण्यातबाबत नोटीस बजावण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

 "