Mon, Apr 12, 2021 03:14होमपेज › Sangli › कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

Last Updated: Nov 22 2020 12:39AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी येत्या पंधरा दिवसांत आरोग्य यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे लोकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचार शुभांरभ कार्यक्रमात ते  बोलत होते.

ते म्हणाले, दिवाळीनिमित्त राज्यात सर्वत्र लोकांनी मोठी गर्दी केली. त्याचे पडसाद येत्या पंधरा ते वीस दिवसांत दिसू लागतील. जानेवारी मध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोना आता संपला असे गृहित धरुन अनेक ठिकाणी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. परंतु कोरोनाने आता पुन्हा डोके वर काढायला सुरूवात केली आहे. चीनमध्येही पुन्हा कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.

सांगली जिल्ह्यात एक दिवस 29 पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या आता पुन्हा सत्तरच्यावर जाऊ लागली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणार्‍या तसेच गर्दी करणार्‍या नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. मंदिरांमध्ये गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी मंदिरे उशिराने उघडण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. 

कोरोना रोखण्यासाठी केंद्र शासनाने उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु केंद्र सरकारने जनतेला दिवे लावायला आणि थाळ्या बडवायला सांगितले. दिवे लावून आणि थाळ्या बडवून कोरोना अटोक्यात आला नाही. केंद्र सरकार देशाला कोणत्या दिशेला नेत आहे ते समजत नाही, असे सांगून त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.

चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था कोलमडली

जयंत पाटील म्हणाले, केंद्र शासनाकडून कोरोना काळात आणि त्यापूर्वी घेण्यात आलेल्या चुकीच्या धोरणामुळे आणि निर्णयांमुळे देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशात आर्थिक मंदी आली आहे. गेल्या वर्षी जून आणि जुलै महिन्यात कारखान्यात उत्पादन कमी झाले आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे देशातील सर्व व्यवसायांना फटका बसला आहे. देशात गेल्या 45 वर्षांत उभी केलेली अर्थव्यवस्था अवघ्या दीड वर्षात कोलमडली आहे. त्यामुळे कारखानदारांमध्येदेखील असंतोष आहे.