Wed, Jun 23, 2021 02:19होमपेज › Sangli › मनपाकडील शिक्षकांची संख्या रोडावली

मनपाकडील शिक्षकांची संख्या रोडावली

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 8:14PMसांगली : शशिकांत शिंदे

महापालिकेच्या प्राथमिक शाळांत काही वर्षापूर्वीपर्यंत प्रत्येक वर्गाच्या अनेक तुकड्या होत्या. हजारवर शिक्षक होते. मात्र आता विद्यार्थी  संख्या घटू लागल्यामुळे शिक्षकांचीही संख्या 178 पर्यंत खाली घसरली आहे. तसेच शिक्षकांकडे दोन-तीन वर्गाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय इतर प्रशासकीय कामाचा बोजा आहे. याचा गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे.  

गेल्या दहा वर्षात राजकीय नेते, काही शिक्षक यांच्यामुळे सरकारी शाळा अडचणीत आल्या. त्यातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत आहे. मात्र महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अनुदानित अनेक शाळांत दर्जेदार शिक्षण मिळते. या शाळांतील विद्यार्थी शालाबाह्य परीक्षा, खेळ यामध्ये यश मिळवत आहेत. तरीसुध्दा अनेक पालक शेजारचा, नातेवाईकांचा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो, यामुळे पाल्याची क्षमता न पाहता त्याला खासगी विनाअनुदानित शाळेत पाठवित असल्याचे चित्र आहे.  

सांगली, मिरज येथे नगरपालिका असताना बहुतेक विद्यार्थी नगरपालिकेच्या शाळांत जायचे. पहिली ते आठवीपर्यंतच्या या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर कला, गुणांना वाव मिळत होता. पुढे तीनही शहराची महापालिका झाल्यानंतर शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. लोकप्रतिनिधी या मंडळावर आले. त्यांच्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल अशी सार्‍यांची अपेक्षा होती.  मात्र तसे झाले नाही. याचवेळी खासगी शाळा आणि त्यांच्या शाखा वाढत होत्या. काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांत तर केरळ, तामिळनाडूमधील शिक्षक आहेत. परिणामी महापालिका शाळातील विद्यार्थी खासगी शाळांकडे वळू लागले.  एकेकाळी महापालिकेच्या शाळात हजारापर्यंत असलेली शिक्षक संख्या 178 पर्यंत खाली आली. परिणामी एका शिक्षकाकडे दोन - तीन वर्गाची जबाबदारी देण्यात आली आहे.  

पालिका शिक्षण विभाग प्रशासनातही अनेक जागा रिक्त आहेत. महापालिका क्षेत्रात मराठी, कन्नड, आणि उर्दू माध्यमाच्या स्वतंत्र शाळा आहेत. पाचवीपासून पुढे हिंदी आणि इंग्रजी शिक्षण देण्यात येते. मात्र इंग्रजी माध्यमामुळे प्रादेशिक आणि मातृभाषेतील शिक्षणाचा मुद्दा बाजूला पडला. बदलत्या काळानुसार महापालिकेने प्राथमिक शिक्षणाकडे पाहण्याचे धोरण बदलले नाही, यातूनच  विद्यार्थी संख्या घटत गेली.

अनुदानितचे तुपाशी, विनाअनुदानितचे उपाशी

शासनाचे अनुदान असलेल्या शिक्षकांना 30 ते 50 हजार रुपये वेतन आहे.  महापालिकेच्या 178 शिक्षकांच्या वेतनासाठी वर्षाला 21 कोटी खर्च होतो.  मात्र खासगी अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना तुटपुंजे वेतन आहे. कामाचे स्वरुप एकसारखे असूनही त्यांना मिळणार्‍या वेतनात मात्र मोठा फरक आहे. परिणामी अनुदानित शाळांचे शिक्षक तुपाशी आणि विनाअनुदानित शाळांचे शिक्षक मात्र उपाशी, अशी स्थिती आहे. 

गुणवत्तेसाठी प्रशासन, शिक्षकांची धडपड

महापालिकेतील शाळांची गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यापासून अनेक अधिकारी धडपडत आहेत. त्यांना काही शिक्षकांची चांगली साथ मिळत आहे. अधिकार्‍यांनी शाळा दत्तक घेतल्या आहेत. यात विविध उपक्रम राबवले जातात.  संजयनगर येथील महापालिकेच्या शाळेत पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.  मात्र याचे ‘मार्केटिंग’ होणे गरजेचे आहे.