Sat, Aug 08, 2020 14:00होमपेज › Sangli › सांगलीत एकाचा खून

सांगलीत एकाचा खून

Published On: Mar 09 2019 1:24AM | Last Updated: Mar 09 2019 1:24AM
सांगली ः प्रतिनिधी

शहरातील संजयनगर येथील मंगळवार बाजार परिसरातील मुख्य चौकात एका कँटीन कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. सुरेश सखाराम पाष्टे (वय 50, रा. समर्थ शाळेजवळ, संजयनगर) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सव्वानऊ ते पावणेदहाच्या दरम्यान ही घटना घडली. त्यांच्यावर पंधरा ते वीस वर्मी घाव करण्यात आले आहेत. गळाही चिरला आहे. 

सुरेश पाष्टे संजयनगर येथील समर्थ शाळेजवळ राहतात. ते येथील भारती हॉस्पिटलमधील कँटीनमध्ये काम करीत होते. शुक्रवारी रात्री कँटीनमधील काम संपल्यानंतर ते सायकलवरून घरी जात होते. मंगळवार बाजार परिसरातील संजयनगरकडे जाणार्‍या मुख्य चौकाच्या वळणावर जात असताना एका मोटारसायकलस्वाराने त्यांच्या सायकलच्या आडवी गाडी घातली. ते थांबल्यानंतर हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. नंतर त्याने हातातील धारदार चाकू काढून त्यांच्यावर सपासप वार केले. 

हल्ल्यानंतर पाश्टे सायकलवरून खाली पडले. हल्लेखोराने  त्यांच्या पाठीवर खोलवर वार केले आणि गळाही चिरण्यात आला आहे. यावेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोराचा चाकू तुटल्याचेही दिसून आले. त्याची मूठ आणि पाते घटनास्थळावरच पडले होते. पाष्टे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाला. 

पोलिस उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.

घटनास्थळी रक्ताचे थारोळे

घटनास्थळी पाष्टे यांच्यावर निर्घृणपणे पंधरा ते वीस वार करण्यात आले होते. त्यामुळे अति रक्तस्त्राव झाल्याने रक्ताचे थारोळे साचले होते. मृतदेहाशेजारीच पाश्टे यांची सायकल पडली. होती. त्यांचा मोबाईल आणि किल्ल्या  जवळच पडल्या होत्या.  

मुलाने फोडला हंबरडा

 वेळेत वडील घरी न आल्याने पाष्टे यांच्या मुलाने त्यांच्या मोबाईलवर फोन केला होता. मोबाईल बंद लागत होता. दरम्यान मंगळवार बाजारजवळ एकाचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तो घटनास्थळी आला होता. त्याने दुरूनच  वडिलांचा मृतदेह ओळखला आणि हंबरडा फोडला. 

वाहतूक पोलिसांकडून पाठलाग

 घटना घडल्यानंतर दहा मिनिटातच वाहतूक शाखेचे गस्तीवरील पोलिस तेथून जात होते. त्यांनी प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे हल्लेखोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडला नाही. 

मृत्यू झाला नाही पाहून चिरला गळा

दरम्यान प्रत्यक्षदर्शीनी एकच हल्लेखोर मोटारसायकलवरून तेथे आल्याचे सांगितले. त्याने प्रथम पाष्टे यांना अडवले. नंतर त्यांच्यावर लहान चाकूने सपासप वार केले.  त्यांचा मृत्यू  झाला नाही, असे पाहून  मोठे धारदार शस्त्र काढून त्यांचा गळा चिरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मोठे धारदार शस्त्र घेऊन  हल्लेखोर दुचाकीवरून (एमएच 10 बीटी 7234) पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.