Sat, Aug 08, 2020 12:20होमपेज › Sangli › थरार! बिबट्या आणि श्वानाची झटापट 

थरार! बिबट्या आणि श्वानाची झटापट 

Last Updated: Jul 13 2020 1:41PM

वारणावती : घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे उमटले होतेवारणावती : पुढारी वृत्तसेवा 

मणदूर (ता.शिराळा) येथील सम्राट अशोकनगर मध्ये सचिन वसंत कांबळे यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील शेडमध्ये काॅटवर बसलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. ही घटना रविवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली .

वाचा :सांगलीत घरात घुसून तरुणावर खुनी हल्ला

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की, मणदूर येथील सम्राट अशोकनगर मधील सचिन वसंत कांबळे यांच्या पाळीव श्वानावर रविवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. जवळ जवळ पंधरा मिनिटे श्वान व बिबट्यामध्ये झटापट सुरु होती. या झटापटीमध्ये श्वानाच्या ओरडण्यामुळे घरातील सचिन कांबळे, रामचंद्र कांबळे, चंद्रकांत कांबळे, विठ्ठल कांबळे यांनी शेडमध्ये धाव घेतली.

त्यावेळी बिबट्याने श्वानाला सोडून पळ काढला. या बिबट्याने श्वानाला शेडपासून दहाफूटावर शिवारात ओडत नेले होते. झटापटीमध्ये श्वानाच्या मानेवर तसेच पाठीमागील पायावर नख्यांचे ओरखडे उमटले आहेत. घटनास्थळी बिबट्याच्या पायांचे ठसे उमटले आहेत. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे श्वानाचा जीव वाचला. मात्र या घटनेमुळे भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने घटनास्थळी पाहणी करुन सापळा लावावा व बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून होत आहे.

वाचा : सांगली : स्वाभिमानी संघटनेतर्फे वीज बिलाची होळी