Mon, Nov 30, 2020 12:53होमपेज › Sangli › मुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास

मुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 06 2018 12:59AMइस्लामपूर : वार्ताहर

शिराळा तालुक्यातील बांबवडे येथील तीन अल्पवयीन मुलींचे  विक्रीच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी त्यांची सावत्र आई विद्या रघुनाथ गायकवाड (वय 36, रा. टाकळी, ता.जि. लातूर) या महिलेस न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावास व 6 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  ही घटना 5 एप्रिल 2017 रोजी घडली होती. 

आरोपी विद्या हिचा बांबवडे येथील मानसिंग धुमाळ याच्याबरोबर विवाह झाला होता. त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुली होत्या. या तीन मुलींना ‘तुमचे चांगले ठिकाणी लग्‍न लावून देतो’ अशी फूस लावून विद्या हिने 5 एप्रिल 2017 रोजी त्यांना हातकणंगले येथे पळवून नेेले होते. तेथे त्यांना भाड्याच्या खोलीत ठेवले होते. अनैतिक कृत्यासाठी या मुलींची विक्री करण्याचा उद्देश होता. तशी चर्चा या मुलींनी ऐकल्याने त्यांनी फोन करून  त्यांच्या चुलत्याला या घटनेची माहिती दिली. 

याप्रकरणी मानसिंग हिंदुराव धुमाळ याने शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करून विद्या हिला   मुलींसह ताब्यात घेतले होते. पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.एन. गायखे यांनी या प्रकरणाचा तपास करून येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीश के.एस.होरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. 

सरकारी पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, अपहृत मुली, तपासी अधिकारी व आरोपीच्या पहिल्या दोन पतींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने कलम 363, 366, 366 अ नुसार विद्या हिला दोषी धरून पाच वर्षे सश्रम कारावास व 6 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 3 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. रणजित पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस हेड कॉन्स्टेबल पी.ए. पवार, चंद्रकांत शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले.