Wed, May 19, 2021 05:09
खरेदीसाठी सांगलीत एकच झुंबड

Last Updated: May 05 2021 2:24AM

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आणि त्यामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.  त्यामुळे आवश्यक वस्तूंची आजच खरेदी करून ठेवण्यासाठी  शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड होती. 

दरम्यान, या गर्दीमुळे संचारबंदीचा मात्र पुरता फज्जा उडाला. धोका असतानाही लोकांमध्ये गांभीर्य फारसे  दिसत नव्हते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर   संचारबंदी आणखी दि. 15 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. औषधे, किराणा दुकाने, भाजी - फळविक्रेते वगळता अन्य दुकाने बंद आहेत. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. तरीसुद्धा रस्त्यावर लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत:  दुचाकीवरून लोक ये - जा करीत आहेत. 

सकाळी अकरापर्यंत खरेदीसाठी लोकांना सवलत देण्यात आली आहे. मात्र तरीही  दवाखान्यात, खरेदीला जायचे आहे, असे सांगून लोक  फिरत  आहेत. संचारबंदी असूनही, कारवाई करूनही लोक नियमांचे पालन करीत नाहीत. मात्र यातूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.

सोमवारी रुग्णसंख्या  पंधराशेवर गेली आहे. मृत्यूचा आकडा 40 च्यावर गेला आहे. पुढील आणखी काही दिवस बिकट स्थिती असेल, असा इशारा प्रशासन देत आहे. तरीसुद्धा  संचारबंदीचे आणि वाढत्या रुग्णसंख्येचे गांभीर्य लोकांमध्ये दिसत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बुधवारपासून जनता कर्फ्यूचा  निर्णय घेतला आहे. 

 जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत. तरीसुद्धा    सात दिवस काही मिळणार नाही, या धास्तीने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले होते. किराणा दुकान, मॉल, भाजी विक्रेते या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती.

शहरात पोलिस अधिकारी,    विविध मार्गावर फिरून नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरू नका, असे आवाहन करीत होते. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांकडून कारवाईचा धडाका...तरीही गर्दी

पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणार्‍यांच्या दुचाकी जप्त करण्यात येत आहेत. दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरीसुद्धा रस्त्यावर लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. दवाखान्यात जायचे आहे. खरेदीला जायचे आहे, असे सांगून अनेक जण- विशेषतः तरुण- विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत.