Fri, Feb 26, 2021 06:22
अनिकेत कोथळे खून प्रकरण : खर्‍या खुन्याला वाचविण्यासाठी स्टेशन डायरीत खाडाखोड

Last Updated: Feb 24 2021 8:27AM

सांगली : पुढारी वृत्तसेवा,

सांगली शहर पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरीतील नोंदीमध्ये अनके ठिकाणी खाडोखोड करण्यात आली आहे. त्यासाठी वेगवेगळी शाई वापरण्यात आली आहे. खरे गुन्हेगार असणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना वाचविण्यासाठीच संगनमताने दीपाली काळे व इतरांनी  बनावट पुरावा तयार केला, असा आरोप बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांनी मंगळवारी न्यायालयात केला.

प्रधान जिल्हा व सत्रन्यायाधीश विजय पाटील यांच्या न्यायालयात अनिकेत कोथळे खून खटलाप्रकरणी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली  काळे यांचा उलट तपास  आज पूर्ण झाला. सरकारपक्षातर्फे  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व त्यांना सहाय्यक म्हणून जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. बचावपक्षातर्फे  अ‍ॅड. प्रमोद सुतार, अ‍ॅड. सी. डी. माने व अ‍ॅड. गिरीष तपकिरे यांनी उलट तपास घेतला. 

 काळे त्यांच्या साक्षीमध्ये म्हणाल्या, स्टेशन डायरी हा गुन्ह्याच्या तपासामध्ये महत्वाचा पुरावा मानला जातो. या डायरीमध्ये खाडाखोड अथवा गैरव्यवहार झाल्यास संबंधित ठाणे अंमलदाराने वरिष्ठांना ती बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे. परंतु घटनेच्या दिवशी ही बाब माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली नाही.

त्या म्हणाल्या, घटनेच्या दिवशी रात्री 12 ते 2.30 पर्यंत मी सांगली शहर पोलिस ठाण्यात होते.  कोथळे याला मारहाण झाल्याचे अथवा त्याला दवाखान्यात नेल्याचे पोलिस ठाण्यातील कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचार्‍याने मला सांगितले नाही. आयर्विन पुलाच्या खाली पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे मला दिसले. परंतु मला तिथे अन्य संशयित आरोपी अथवा कोणीही दिसले नाही. तसेच  पोलिस स्टेशनची  गाडी तिथे मला दिसून आली नाही. स्टेशन डायरीमध्ये माझ्या सह्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

अन्य पोलिसांच्या मदतीने  कामटे व अन्य आरोपींना वाचविण्यासाठी तुम्ही स्टेशन डायरीमध्ये खाडाखोड व अन्य खोटा पुरावा तयार केला, असा अरोप बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. सी. डी. माने व अ‍ॅड. गिरीश तपकीरे यांनी यावेळी केला. या खटल्याची पुढील सुनावणी बुधवारी  होणार आहे. 

...अन उज्ज्वल निकम संतापले

दीपाली काळे साक्ष देत असताना बचावात्मक स्वरूपात मोजक्या शब्दात उत्तरे देत होत्या. युवराज कामटे व अन्य संशयितांबाबत स्पष्ट उत्तर देण्याचे टाळत होत्या. म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम संतापले होते.स्पष्ट शब्दात बोला, असे त्यांनी  दोनवेळा  सुनावले.