Tue, Aug 04, 2020 11:18होमपेज › Sangli › पतीच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू

पतीच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू

Last Updated: Jul 11 2020 12:03AM
तासगाव : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील बसवेश्वरवाडी येथील नानासो किसन पाटील (वय 60)  यांचा  शुक्रवारी सकाळी मिरज येथील कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दुपारी बसवेश्वरवाडी येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. नातेवाईकांनी पतीचे निधन झाल्याची माहिती पत्नी ताराबाई नानासो पाटील (वय 55) यांना सांगताच हा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. 

चार दिवसांपूर्वी नानासो पाटील यांना सावळज येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. कोरोनाची लक्षणे आढळल्याने प्रशासनाने मिरज येथील कोविड रुग्णालयात पाठवले. गुरुवारी दुपारनंतर त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास नानासो पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या स्वॅबचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मृतदेह बसवेश्वरवाडी गावात आणण्यात आला. परंतू याची माहिती पत्नी ताराबाई यांना देण्यात आली नव्हती.  

तहसिलदार कल्पना ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सुर्यवंशी, गट विकास अधिकारी दीपा बापट, पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत   पाटील यांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आले. 
अंत्यविधी उरकून परत येताच पती नानासो पाटील यांचे निधन झाले असल्याची माहिती कुटूंबियांनी पत्नी ताराबाईंना दिली. ही बातमी त्यांनी ऐकताच धक्का सहन न झाल्याने ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर केवळ पाच तासात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.