पुढारी ऑनलाईन डेस्क
पोलिसांच्यावर विश्वास ठेवून समाजात निर्धास्तपणे वावरावं आणि त्यांनीच कौर्याची परिसीमा गाठावी, अशी घटना म्हणजे अनिकेत कोथळेचा मर्डर. हा मर्डर कुणी इतर सराईतांनी नव्हे तर, चक्क खाकीमध्ये वावरणाऱ्या पोलिसांनी केलेला होता. तीन वर्षांपूर्वी अनिकेत कोथळेच्या खूनाने अख्खा महाराष्ट्र हादरला होता. कारण, या भयानक घटनेतून पोलिसांच्या वेशातील गुंड जगासमोर आले होते. कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या या खटल्याची सुनावणी सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. ही सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर होत असून या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकारची बाजू मांडणार आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा गुन्हेगारीविश्वात अनिकेत कोथळे खून प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. चला तर, अनिकेत कोथळेचा नेमका खून कसा झाला आणि पोलिसांनी या प्रकरणाला कसे वळण दिले, ते पाहू या...
वाचा : अनिकेत कोथळे खून प्रकरण : भंडारेच्या जबाबात विसंगती
६ नोव्हेंबर २०१७ ची घटना. मुंबईत अभियंता पदावर नोकरीला असणारे संतोष गायकवाड आपल्या सासरवडाली म्हणजेच नांदणीला जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते. त्यावेळी काही संशयितांनी त्यांना गाठले आणि म्हणाले की, चल भावा, तुला नांदणीला सोडतो म्हणत त्यांना दुचाकीवर बसविले. त्यानंतर कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ संशयितांनी गाडी थांबविली आणि चाकू काढत संतोष गायकवाड यांनी धाक दाखवला. अन् जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून २ हजार रुपये आणि मोबाईल काढून घेतला होता.
वाचा : अनिकेत कोथळे खूनप्रकरण : कामटेने पिस्तूल लावून दिली धमकी
चाकूचा धाक दाखवून संतोष गायकवाड यांना लुटल्याप्रकरणी सांगलीच्या पोलिसांनी केवळ २४ तासांत घटनेचा तपास लावला. त्यामध्ये अवघे २५ वर्ष वय असलेल्या अनिकेत कोथळेला आणि अमोल भंडारीला अटक केली. तर, न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरण शाखेतील उपनिरिक्षक युवराज कामटे आणि हवालदार अनिल लाड, अरूण टोणे, नसरुद्दीन मुल्ला,राहूल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी रात्री साडेनऊला चौकशीसाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कार्यालयात नेले.
वाचा : कोथळे कुटुंबीयांना जिवे मारण्याची सुपारी
वरील पोलिसांनी अनिकेतला पंख्याला उलटे टांगले आणि थर्ड डिग्रीला सुरुवात केली. यावेळी पाईपचा वापर करत जबर मारहाण करण्यास सुरु केले. पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये अनिकेतचे तोंड बुडविण्यात आले होते. या मारहाणीत अनिकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच अनिकेतचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कामटे आणि इतर पोलिसांना घाम फुटला आणि झालेली चूक लपविण्यासाठी पुढेची पावले उचलली गेली. इथंच या घटनेला वेगळी कलाटणी मिळते. कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेला धाब्यावर बसवत पोलिसांनी पुढचा भयानक प्रकार करण्यास सुरूवात केली. मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या अनिकेतच्या मृतदेहाला पोलिसांनी गाडीत घालून आंबोली घाटात आणले. सुरुवातीला त्यांना हा मृतदेह आंबोली घाटात फेकून द्यायचा होता. मात्र, फेकलेला मृतदेह कोणाच्या हाती लागला आणि बिंग फटले तर पंचायत होईल. म्हणून बिथरलेल्या पोलिसांनी आंबोलीतील महादेवगड प्वाॅईंट येथे रात्रीच्या वेळी कुणी येत नाही याची खात्री करून मृतदेह बाहेर काढला आणि पेट्रोल ओतून अनिकेतचा मृतदेह पेटवून दिला. अनिकेतचा मृतदेह व्यवस्थित जळला नाही म्हणून पुन्हा पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
वाचा : अनिकेत कोथळे याचा संगनमताने खूनच
एखाद्या गुन्हेगाराने खून करावा आणि त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करावा, नेमकं तेच सांगलीच्या पोलिसांनी केले. आंबोली घाटात अनिकेतचा मृतदेह जाळल्यानंतर पोलिसांनी सांगलीचा रस्ता धरला. केलेले कृत्य हुशारीने लपवायचे म्हणून युवराज कामटे आणि इतर पोलिसांनी रचलेला बनाव असा की, अनिकेत आणि अमोलला रात्री उशीरा पोलिस कोठडीतून बाहेर काढण्यात आल होते. चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ठाण्याच्या पायरीवर बसवले होते. पोलिस त्यांच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून पोलिसांची नजर चुकवून ते दोघे पळून गेले. रात्री साडेबारा वाजता पोलिस उपअधिक्षक डाॅ. दीपाली काळे आरोपींच्या चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आल्या. त्यावेळी आरोपी पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. विचारणा केल्यानंतर ही उघडकीस आली आणि ड्यूटीवरील पोलिसांनी दोघांच्या शोधासाठी पहाटेचे ४ वाजेपर्यंत नाकाबंदी केली होती, अशी काल्पनिक पण व्यवस्थेला खरा वाटेल असा बनाव कामटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. अनिकेतच्या कुटुंबियांनी घटनेचा पाठपुरावा केला आणि पोलिसांचे हे कृत्य जगासमोर आले.
वाचा : अनिकेत कोथळेचा मृत्यू शरीरांतर्गत रक्तस्त्रावानेच
घटना वाचताना अस वाटू शकतं की, आपण एखादा थरारक चित्रपट पाहत आहे. परंतु, महाराष्ट्रात कर्तव्यनिष्ठ समजल्या जाणाऱ्या पोलिस खात्यात घडली अन् राज्यभरात खळबळ माजली. घटनेला जवळजवळ तीन वर्ष होत आहेत. न्यायालयात सुरु असलेली ही केस कोरोनाच्या परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आली होती. मात्र, सोमवारपासून पुन्हा सुनावणी सुरू झालेली आहे. यामध्ये अनिकेत कोथळेचा एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या अमोल भंडारेची साक्ष घेण्यात आली आहे. पुढचा तपास आणि न्यायालयीन खटला सुरू आहे. अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांनी न्याय मिळेल का? घटनेतील आरोपींना शिक्षा होईल का? पोलीस व्यवस्था पुन्हा अशी घटना होणार नाही, याची खबरदारी घेईल का? महाराष्ट्र पोलीसांविषयी सामान्यांच्या मनात असलेला आदर आणि सुरक्षिततेची भावना टिकून राहिल का?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं न्यायमुर्तींच्या निर्णयानंतरच आपल्याला मिळू शकेल.