Wed, Jun 23, 2021 02:45
शेततळ्यात पडून दोन बालकांचा मृत्यू

Last Updated: Jun 11 2021 2:49AM

मांजर्डे : पुढारी वृत्तसेवा

आरवडे (ता. तासगाव) येथे घराशेजारी असलेल्या शेततळ्यात पडून दोन बालकांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. शौर्य संजय मस्के (वय 6, रा. आरवडे, ता. तासगाव) आणि ऐश्वर्या आप्पासाहेब आवटी (वय 8, रा. माधवनगर) अशी त्यांची नावे आहेत. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

आरवडे-गोटेवाडी रस्त्यालगत असलेल्या मस्के वस्ती येथे घराबाहेर शौर्य व ऐश्वर्या हे दोघे खेळत होते. सायंकाळी दोघेही घरी  किंवा आसपास दिसले नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, ते दोघे सापडले नाहीत.

घरामागे असलेल्या शेततळ्याकडे लोक शोधायला गेले. त्यावेळी शेततळ्यात मोबाईल  दिसला. त्यामुळे मुले पाण्यामध्ये घसरून पडल्याचा संशय आला. तरुणांनी पाण्यात शोध सुरू केला. शेततळ्याच्या तळभागात दोघेही मृत सापडले. 

त्यांना पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, दोघांचाही मृत्यू झाला होता. ऐश्वर्या ही माधवनगर येथून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती.  शौर्य हा  एकुलता एक  होता तर ऐश्वर्या हिला दोन लहान भाऊ आहेत.

मोबाईलवरून अंदाज आला

दोन्ही बालकांचा शोध सुरू होता. त्यामुळे ती कोठे गेली असतील याची तिच्या नातेवाईकांना चिंता वाटत होती.  शेततळ्याकडे जाऊन शोध घेतला असता तळ्यावर मोबाईल दिसला. त्यानंतर तरुणांनी 
पाण्यात उड्या टाकून दोघांना बाहेर काढले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

आरोग्य विभागाची सतर्कता

या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक धक्का बसला. अनेकांना त्रास होत होता. त्यामुळे आरोग्य विभागाचे डॉ. रोहित जाधव, गणेश करांडे, आरोग्यसेविका माळी   रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांच्यावर उपचार करीत होते.