Thu, Oct 01, 2020 16:55होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेतही ‘महाशिवआघाडी’चा प्रयोग ?

जिल्हा परिषदेतही ‘महाशिवआघाडी’चा प्रयोग ?

Last Updated: Nov 12 2019 1:29AM
सांगली : उध्दव पाटील
राज्यात ‘महाशिवआघाडी’ प्रयोग आकाराला आल्यास जिल्हा परिषदेतही हा प्रयोग घडू शकतो. जिल्ह्याच्या राजकारणाची फेरमांडणी होऊ शकते. जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्तेचा टेकू शिवसेना काढून घेईल. रयत विकास आघाडीतील महाडिक गट व सी. बी. पाटील गट निर्णायक ठरणार आहे. भाजपशी बांधिल नसल्याचे जाहीर करून सम्राट महाडिक यांनी सवतासुभा मांडलेला आहे. अजितराव घोरपडे गटाकडेही लक्ष लागले आहे. 

राज्याच्या सत्तेवरून राजकारणाची वेगळी समीकरणे पुढे येत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्याजिल्ह्यातील राजकारणावर व सत्ताकारणावर  उमटणार असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेत डिसेंबर - जानेवारीत पदाधिकारी निवडणूक आहे. राज्यात महाशिवआघाडी आकाराला येत असतानाच जिल्हा परिषदेतही ‘महाशिवआघाडी’ चा प्रयोग होईल, असे संकेत मिळत आहेत. 

जिल्हा  परिषदेच्या 60 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे सदस्य 23 आहेत. भाजप पुरस्कृत  सदस्य 2 आहेत. शिवसेना 3, रयत विकास आघाडी (वाळवा तालुका) 4 आणि अजितराव घोरपडे गटाच्या 2 सदस्यांच्या टेकूवर भाजपची सत्ता अबाधित राहिली. 

‘महाशिवआघाडी’ च्या सरकारमध्ये शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या म्हणजे बाबर समर्थक सर्व 3 सदस्यांनी भाजप सत्तेचा टेकू काढून घेतल्यास त्यात नवल असणार नाही. नानासाहेब महाडिक गटाने नुकताच पेठनाका येथे मेळावा घेतला. कार्यकर्त्यांना सन्मान देणार्‍या पक्षाचा झेंडा हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्याला सी. बी. पाटील हेही उपस्थित होते. जिल्हा परिषदेत रयत विकास आघाडीतील 4 सदस्यांमध्ये महाडिक गटाचे 2 सदस्य, तर एक सदस्य सी. बी. पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक समर्थक आहेत. विधानसभा निवडणुकीत गौरव नायकवडी हे ऐनवेळी शिवसेनेचे उमेदवार झाले.  जिल्हा परिषदेत नायकवडी गटाच्या एका सदस्यांची भूमिका काय राहणार हेही उत्सुकतेचे ठरणार आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीत कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी व घोरपडे गटाची आघाडी झाली होती. मात्र जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीवेळी घोरपडे यांनी भाजप आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र विधानसभा निवडणुकीत घोरपडे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यावरून भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या भूमिकेविषयी घोरपडे समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे. या पार्श्‍वभूमीवर घोरपडे गटाचा पवित्रा औत्सुक्याचा राहणार आहे. 

जिल्हा परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संख्याबळ 1 आहे.   ‘स्वाभिमानी’ ने भाजपशी केव्हाच फारकत घेतलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत ते महाआघाडीसोबत असणार हे स्पष्ट आहे. 
सत्यजित देशमुख यांचा भाजप प्रवेश, विक्रमसिंह सावंत हे आमदार झाल्याने त्यांनी दिलेला जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा, राष्ट्रवादीचे सदस्य चंद्रकांत पाटील यांचे निधन यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ 3 ने कमी झालेले आहे.  पदाधिकारी निवड डिसेंबर-जानेवारी दरम्यान होण्याचे संकेत आहेत. 

तत्पूर्वी पोटनिवडणुकीची शक्यता  नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 29 संख्याबळ लागणार आहे. हा आकडा कोण पार करणार यावर जिल्हा परिषदेची सत्ता कोणाकडे राहणार हे ठरणार आहे.

जिल्हा परिषद : सत्ताधारी-विरोधी आघाडी बलाबल
सत्ताधारी आघाडी    

भाजप + पुरस्कृत                  23+2    
शिवसेना                                  03    
रयत विकास आघाडी                 04    
अजितराव घोरपडे गट               02        
                   एकूण                  34     
विरोधी आघाडी
राष्ट्रवादी                  14 - 1 (रिक्त) = 13
काँग्रेस                     10 - 2 (रिक्त) = 8
राष्ट्रवादी बंडखोर         01
एकूण                      25 - 3 (रिक्त) = 22 
                                        
  स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01

 "