Wed, Jun 23, 2021 02:14होमपेज › Sangli › काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी खल सुरू 

काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी खल सुरू 

Published On: Mar 14 2019 2:05AM | Last Updated: Mar 14 2019 2:05AM
सांगली : प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ अद्यापही सुरु आहे.  माजी मंत्री प्रतीक पाटील यांचे नाव काहीसे मागे पडले आहे; परंतु युवा नेते विशाल पाटील व सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे नेते  पृथ्वीराज पाटील यांची नावे अंतिम चर्चेत आहेत. गेले काही दिवस  सांगली व नगर या  मतदारसंघाच्या अदलाबदलीची चर्चा होती. मात्र नगरमधून सुजय विखे-पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परिणामी अदलाबदलीची चर्चा आता संपल्यात जमा आहे. 

सांगली मतदारसंघ आता  काँग्रेसकडेच राहील असे दिसते आहे. काँग्रेसकडून आघाडीवर नाव असणार्‍या आमदार डॉ.विश्‍वजीत कदम यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विशाल पाटील,  प्रतीक पाटील व   पृथ्वीराज पाटील यांच्या नावांची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. अर्थात प्रतीक यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखविली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विनिंग मेरिट असलेल्या दादा घराण्यालाच प्राधान्य द्यायचे असेल तर विशाल पाटील हेच मुख्य दावेदार आहेत. विशाल यांचे नाव प्रदेश पातळीवरून दिल्लीकडे पुढे रेटले जात असल्याचे समजते. मात्र मित्रपक्षांना विचारात घेऊनच काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी येथील जागेचा निर्णय घेतील असे दिसते.

वसंतदादा कुटुंबातील सदस्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन जर डॉ. विश्वजित कदम निवडणूक लढवण्यास तयार नसतील तर विशाल यांच्या नावाचा विचार व्हावा, असा आग्रह धरल्याचेही समजते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत  पाटील आणि  विश्वजित कदम यांनी जर विशाल यांच्यासाठी सहमती दर्शवली तर त्यांचे नाव पुढे येऊ शकते, मात्र याबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. पृथ्वीराज पाटीलदेखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या गोटातून प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. त्यांनी दिल्लीतही पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. त्यामुळे  त्यांचेही नाव सतत चर्चेत आहे.