कराड : प्रतिनिधी
विधानसभा माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख याचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी आज सोमवारी (ता.१६ )कराड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सत्यजित देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा शनिवारी रात्री दिला आहे. त्यानंतर सत्यजित देशमुख आज कराड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, आमदार शिवाजीराव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेचे माजी सभापती व सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. तेव्हापासून सत्यजित यांना भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. “स्वार्थावर उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादीची शकलं उडायला लागली आहेत. शरद पवारांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले”, अशी टीका सत्यजित देशमुख यांनी भाजपा प्रवेशापूर्वी केली.