Sat, Aug 15, 2020 13:14होमपेज › Sangli › भाजप-काँग्रेस उमेदवारीत शह-काटशहाची गणिते

भाजप-काँग्रेस उमेदवारीत शह-काटशहाची गणिते

Published On: Mar 12 2019 1:50AM | Last Updated: Mar 11 2019 9:06PM
सांगली : अमृत चौगुले

सांगली लोकसभा निवडणुकीत  भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत होणार, हे स्पष्ट आहे.भाजपचे विद्यमान  खासदार संजय पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार याचा समर्थकांना ठाम विश्वास आहे. तरीही पक्षांतर्गत नाराजीवरून  उमेदवारीबद्दल  खल सुरू आहे. 

उमेदवारी ठरविताना काँग्रेसमध्येही गटबाजीचा प्रश्‍न आहे. त्यामुळे दोन्हीकडूनही उमेदवारी निवडीतच शह-काटशहाची समीकरणे आणि कोण-कोणाला मदत करणार, यावरच निवडणुकीच्या जय-पराजयाची व्यूहरचना ठरणार आहे. 

गेल्या  निवडणुकीत  मोदी लाटेबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादीतील गटबाजी जोरात होता. त्यातून भाजपला तयार नेते, कार्यकर्त्यांचे ‘इनकमिंग’चे मोठे बळ मिळाले. त्यामुळे काँग्रेसचा लोकसभेचा गड  भुईसपाट झाला. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील विरुद्ध भाजपचे राष्ट्रवादीतून आलेले संजय पाटील यांच्यात ही लढत होती. संजय पाटील यांच्या विजयामागे भाजपची जिल्ह्यातील मर्यादित शक्‍ती होती. बाकी सर्व रसद कुठून मिळाली होती, ते सर्वज्ञात  आहे. 

परंतु यानंतर बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. संजय पाटील यांचे भाजपपेक्षा विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीशी चांगले सख्य व अन्य काही कारणे याला कारणीभूत ठरली आहेत. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, गोपीचंद पडळकर हे महत्त्वाचे भाजपचे समर्थक खासदार पाटील आणि भाजपपासून सध्या तरी दुरावले आहेत अशी चर्चा आहे.  त्याचवेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुरेश खाडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ यांच्याशीही कुरबूर सुरू आहे. खा. पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांच्यासोबतच ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीबद्दल चर्चा  सुरू आहे. 

दुसरीकडे काँग्रेसकडून माजी मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यादृष्टीने प्रत्येकाच्या आपापल्यापरीने उमेदवारीसाठी मुंबई-दिल्ली वार्‍या आणि  उमेदवारीसाठी पाठपुरावाही सुरू आहे. यामध्ये काँग्रेसमधील वसंतदादा गट, मदन पाटील समर्थक गट, डॉ. पतंगराव कदम  गट आणि त्यादृष्टीने एकीचे पाठबळ मिळणे उमेदवारीसाठी महत्त्वपूर्ण आहे. 

आमदार डॉ. विश्‍वजित कदम हेसुद्धा प्रबळ दावेदार ठरू शकतात, अशी चर्चा होती. पण त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीस नकार दिला आहे. मात्र पक्ष जो उमेदवार देईल त्याचा पूर्ण ताकदीने प्रचार करीन अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. अर्थात या निवडणुकीच्या जय-पराजयावर भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची दिशा ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीतून ‘तगडा’ उमेदवार देऊ, असे खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केले होते. आता निवडणुका जाहीर झाल्याने आघाडीला तुल्यबळ आणि विजयाची वाटचाल सोपी ठरणारा तुल्यबळ उमेदवार निवडावा लागणार आहे. 

सर्वच नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला...!

या मतदारसंघात  भाजपची बाजू पुन्हा बळकट करण्यासाठी स्थानिक नेत्यांबरोबरच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेसकडेही  हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजपला नामोहरम करणे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांचे टार्गेट असेल. त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

स्थानिक पातळीवरील भूमिकाही महत्त्वाच्या

राष्ट्रवादीतील काहींनी गेल्या  लोकसभा निवडणुकीत छुप्या पद्धतीने भाजपला मदत केली होती. त्याच जोरावर पहिल्यांदाच भाजपने विजय मिळविला. आता राष्ट्रवादीची मदत होणार नाही. पण स्थानिक पातळीवर ज्या-त्या तालुक्यात नगरपालिका, पंचायत समिती, नगरपालिका-ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजप-सेनेतही गटबाजी  आहे. स्वपक्षापेक्षा इतर पक्षांशी अधिक मैत्री आहे. त्यामुळे  त्यांची पक्षनिष्ठा की मैत्रीची भूमिका  यावर बेरीज-वजाबाकीची समीकरणे ठरतील.