Tue, Sep 29, 2020 19:01होमपेज › Sangli › सांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे

सांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 06 2018 1:08AMसांगली/मिरज : प्रतिनिधी

सांगलीतील गोकुळनगर आणि मिरजेतील प्रेमनगरमधील कुंटणखान्यांवर शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांच्या तीन पथकांनी छापा टाकला. मिरजेत नऊ तर सांगलीत दोन अशा एकूण 11 पीडित महिलांची यावेळी सुटका करण्यात आली. कुंटणखाना चालवून मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी तीन महिलांसह पाचजणांना अटक करण्यात आली.  

सदा ऊर्फ किरण कांबळे, बडी मम्मी (पूर्ण नाव नाही), संगीता गोसावी ऊर्फ कांबळे, सल्लाऊद्दीन अकबर लष्कर (रा. पश्‍चिम बंगाल) यांना मिरजेत अटक करण्यात आली तर ज्योती संतोष कट्टीमणी (वय 27) या महिलेला सांगलीत अटक केली. 

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यातील वेश्या व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले होते. गोकुळनगर आणि प्रेमनगर येथे संशयित कुंटणखाना चालवित असल्याची माहिती अतिरिक्‍त अधीक्षक बोराटे यांना मिळाली होती. त्यांनी सांगलीचे पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर व मिरजेचे उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार केली. या पथकांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकांनी शुक्रवारी रात्री उशीरा गोकुळनगर आणि प्रेमनगर येथे ही कारवाई केली. 

गोकुळनगर येथील कुंटणखान्याप्रकरणी फ्रीडम फर्म संस्थेचे अब्राहम शशिकांत हेगडे यांनी फिर्याद दिली आहे. गोकुळनगर येथे ज्योती कट्टीमणी कुंटणखाना चालवत असल्याची माहिती फ्रीडम फर्म संस्थेला मिळाली होती. शिवाय ती बांगलादेशी महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचीही माहिती संस्थेला मिळाली होती. 

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास उपअधीक्षक वीरकर आणि त्यांच्या पथकाने गोकुळनगर येथे छापा टाकला. त्यावेळी ज्योतीला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून रोकड व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी दोन बांगलादेशी पीडित मुलींची सुटका करण्यात आली. तिच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर  पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची कबुली तिने दिली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकऱणी विश्रामबाग आणि महात्मा गांधी पोलिस ठाणे येथे पाचही संशयितांविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एजंटाचा युद्धपातळीवर शोध

दरम्यान ज्योती कट्टीमणीला वेश्या व्यवसायासाठी एक एजंट मुली पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. छाप्याच्यावेळी तो सापडला नाही. मात्र त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिस सुत्रांनी सांगितले. 

अल्पवयीन मुलीचाही समावेश 

दरम्यान मिरजेत टाकलेल्या छाप्यावेळी नऊ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच ती अल्पवयीन आहे की नाही याचा उलगडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.