Wed, Oct 28, 2020 11:13होमपेज › Sangli › कृषी विधेयकाच्या निषेधार्थ सांगलीत निदर्शने

कृषी विधेयक रद्द करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगलीत निदर्शने

Last Updated: Sep 25 2020 2:03PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर विधेयकाच्या प्रती फाडून निषेध करण्यात आला.

वाचा :  भेसळीच्या संशयावरून दोन दूध केंद्रांवर छापा

सदर आंदोलन जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी रद्द करा, रद्द करा, कृषी विधेयक, रद्द करा, शेतकऱ्यांना देशो धडीला लावणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नुकतीच संसदेत तीन कृषी विधेयक पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करून शेतकऱ्यांना मातीमोल करण्याचा विडा उचलला आहे. शेतकरी हितापेक्षा व्यापारी आणि उद्योगपतींना फायदा होण्याच्या दृष्टीने ही बिले तयार करण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या हेतूने तयार केलेली बिले शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ढकलणारी आहेत. एमएसपी रद्द करून सर्वच संरक्षण काढून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मींगच्या माध्यमातून उद्योगपतींना खुली सुट आणि शेतकऱ्यांना मजूर बनविणारे धोरण आखले जात आहे. शेती माल साठवणुकीसाठी ही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्याचे उखळ पांढरे होणार आहे. तसेच बाजार समितीच्या बाहेर खरेदी झालेल्या शेती मालाची खरेदी करण्यासाठी कोणतेही बंधने नाहीत. शेतीमालाची कुठेही खरेदी झाली तरी ती एमएसपीच्या खाली करता येणार नाही, असे बंधन घालण्यात येणे आवश्यक आहे. एकंदरीतच वरवर शेतकरी हिताची भाषा करणारे शेतकऱ्यांना गुलाम करत आहेत. याविधेयकपेक्षा कमी व्याज दराने पीक, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा, शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेची सुविधा, हमी भाव, साठवणीसाठी वेयर हाऊस, कोल्ड स्टोरेज, प्रेकॉलींग युनिट आदींची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांना अन्य विधेयकाची गरज नाही.

 यावेळी भरत चौगुले, श्रीधर उधगावे, बाळासाहेब लिंबेकाई, सुरेश पचिब्रे, मारुती देवकर, प्रल्हाद पाटील आदीसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचा : सांगली जिल्ह्यात ‘कोरोना’ने २९ मृत्यू; दिवसात ६८५ रुग्ण

 "