Wed, Jun 23, 2021 00:51होमपेज › Sangli › इस्लामपूर, शिराळ्यातून ५२७ जण हद्दपार

इस्लामपूर, शिराळ्यातून ५२७ जण हद्दपार

Last Updated: Oct 20 2019 1:26AM
इस्लामपूर : वार्ताहर
विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातील 527 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तर 1338 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. निवडणूक निकालानंतर कोणालाही विजयी मिरवणूक काढण्याची परवानगी   देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 
उपअधीक्षक पिंगळे म्हणाले, इस्लामपूर मतदारसंघात 7 तर शिराळा मतदारसंघात 1 मतदान बूथ संवेदनशील आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेे बसविण्यात येणार आहेत. निवडणूक शांततेत व भयपूर्ण वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा  पोलिसप्रमुख सुहेल शर्मा व अप्पर जिल्हा पोलिसप्रमुख मनिषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रयत्न सुरू आहेत. 

1865 जणांवर कारवाई...

ते म्हणाले, कलम 144 (2) प्रमाणे 527 जणांना हद्दपारीची नोटीस दिली आहे.  कलम 107 प्रमाणे 276, 109 प्रमाणे 1, 110 प्रमाणे 35, 149 प्रमाणे 918, 151 प्रमाणे 8, 55/56/57 प्रमाणे 4 जणांवर तर 93 प्रमाणे 41 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच 323 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर कारवाई करून 1 पिस्तुल व 1 राऊंड जप्त करण्यात आला आहे. दारूबंदीच्या  24 केसमध्ये 24 जणांवर कारवाई करून 1 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

ग्रुप अ‍ॅडमीनांना नोटीसा...

याआधी इस्लामपूर उपविभागातील 5 टोळ्यांविरोधात याआधी मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 542 व्हॉटस्अप ग्रुप अ‍ॅडमीनांना नोटीस देण्यात आली आहे. मतदारसंघातील 188 गावांना भेटी देऊन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केले आहे. इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, आष्ट्याचे भानुदास निंभोरे, शिराळ्याचे विशाल पाटील, कुरळपचे अरविंद काटे, कासेगावचे सोमनाथ वाघ, कोकरूडचे दत्तात्रय कदम या अधिकार्‍यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

1277 पोलिसांचा बंदोबस्त...

निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी इस्लामपूर मतदारसंघात 1 पोलिस उपअधीक्षक, 3 पोलिस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलिस निरीक्षक-पोलिस उपनिरीक्षक, 245 कर्मचारी, सीआरपीएफची 1 कंपनी, 197 होमगार्ड तर शिराळ्यासाठी 1 पोलिस उपअधिक्षक, 2 पोलिस निरीक्षक, 19 सहाय्यक पोलिस निरीक्षक-पोलिस उपनिरीक्षक, 325 कर्मचारी, सीआरपीएफची 1 कंपनी, 174 होमगार्ड असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, भानुदास निंभोरे उपस्थित होते.