Sat, Feb 27, 2021 05:50
सांगली महापालिका: जयंत पाटलांनी केला चंद्रकांत पाटलांचा दुसऱ्यांदा ‘कार्यक्रम’; पदवीधर मतदारसंघानंतर महापालिकेच्या मैदानात धोबीपछाड

Last Updated: Feb 23 2021 4:46PM

पुढारी ऑनलाईन डेस्क

'राजकारण करताना डोकं शांत ठेवायचं, उगाच मनात आलं म्हणून काहीही करायचं नाही. टप्प्यात आलं की सोडायचं नाही. आपण कार्यक्रम करतोच...' राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची हे वाक्य विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड गाजलं, आजही गाजतं. शांतपणे कार्यक्रम करण्याची त्यांची हातोटी अनेकांना झटका देणारी ठरली आहे. मिश्किल बोलणारे पाटील कसा कार्यक्रम करतात याची प्रचिती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनंतर सांगलीने दुसऱ्यांदा अनुभवली ती महापौर निवडीत. मुळात या ‘कार्यक्रमाचा’ झटका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरात बसला आहे.

वाचा : आम्ही लग्नाळू : नवरी मिळेना नवऱ्याला

पाच वर्षांपूर्वी राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षविस्ताराचा सपाटा लावला. त्यात अनेक राष्ट्रवादीचे लहान मोठे कार्यकर्ते गळाला लागले. सांगली महापालिकेत  ७७ पैकी  ४३ नगरसेवक निवडूण आणत भाजपची सत्ता आणली. त्यात बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतून फुटून गेलेले होते. हा राष्ट्रवादीचे बडे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्का मानला जात होता. मात्र, नेहमीप्रमाणे जयंत पाटील शांत राहिले. २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपचा बालेकिल्ला झालेल्या सांगलीत ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे नियोजन पाटील यांनी केले. गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीच्या गोटातून बाहेर गेलेल्या नगरसेवकांना साद घालत होते. कार्यक्रमाचा अंदाज असल्याने गोटातून उडालेली पाखरे परतीच्या मार्गावर लागली आणि भाजपला हादरे बसू लागले. अडीच वर्षानंतर महापौरपदाचा कालावधी संपला आणि खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद असल्याने राष्ट्रवादी तयारीला लागली. फुटून गेलेले अनेक नगरसेवक दोन प्रकारातील होते. पहिला प्रकार म्हणजे राष्ट्रवादीतील अंतर्गत लाथाळ्यांना कंटाळेले आणि दुसरा प्रकार होता तो सत्तेकडे झुकणारे. या दोन्ही प्रकारांची मोट बांधत १२ नगरसेवक उचलले. त्यातूनही दोघे-तिघे माघारी परतले.  तर चार पाच जण नॉट रिचेबल राहिले. तरीही व्हायचा तो कार्यक्रम झाला आणि राष्ट्रवादीने महानगरपालिका टप्प्यात आणली.

वाचा  सांगली महापालिका : जयंत पाटलांनी 'असा' केला विरोधकांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम

पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला. चंद्रकांत पाटील यांचे वर्चस्व असल्याने येथे भाजपचा उमेदवार डोळे झाकून निवडून येईल असे अंदाज बांधले होते. मात्र, या निवडणुकीतही जयंत पाटील यांनी अरुण लाड यांना मैदानात उतरवले. त्यांच्याविरोधात संग्राम देशमुख भाजपकडून उमेदवार होते. महाविकास आघाडीने योग्य नियोजन लावत पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी जयंत पाटील आणि शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी सतेज पाटील यांच्याकडे दिली. या दोन्ही जागा प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. जयंत पाटील यांनी भाजपचा हा बालेकिल्ला करेक्ट कार्यक्रम करत उद्ध्वस्थ केला.

वाचा : द्वादशी दिवशी देखील विठ्ठल मंदिर राहणार बंद

भाजपचे कुठे चुकले
मुळात सांगलीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये  फारसे सख्य नाही. अनेक गटातटांत ही विभागणी आहे. जयंत पाटील, आर. आर. पाटील गट, पतंगराव कदम गट, प्रतीक पाटील गट, मदन पाटील गट अशी विभागणी आहे. तरीही सध्या जयंत पाटील यांचेच जिल्ह्यावर वर्चस्व आहे. संस्थात्मक पातळीवरील बांधणी  आणि  कार्यकर्त्यांचे जाळे ही राष्ट्रवादीची बलस्थाने आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालिन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा वारू चौफेर उधळत होता. ते जातील तेथे भाजपविस्तार होत होता. राष्ट्रवादीच्या जहाजात पाणी शिरल्याप्रमाणे नेते, कार्यकर्ते फुटून भाजपच्या जहाजात जात होते. भाजपमध्ये बहुतांश पक्षप्रवेश हा राष्ट्रवादीतून आलेल्यांचा होत होता. सांगलीतही तेच झाले.

मात्र भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देणारे, संस्थांत्मक पातळीवर बांधून ठेवणारे नेतृत्व भाजपमध्ये नसल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. आमदार सुधीर गाडगीळ, मिरजचे आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर अशी फौज असूनही त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. संस्थात्मक पातळीवरील बांधणीत भाजप अजूनही राष्ट्रवादीपेक्षा कित्येक मैल मागे असल्याने पुढील काळात पक्षविस्तारालाही मर्यादा येणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून लढण्याऐवजी कोथरूड मतदारसंघ निवडला. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोनही जिल्ह्याला वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे. स्वत:हून मैदान सोडल्यासारखे त्यांच्या भरवशावर भाजपात गेलेल्या नेते, कार्यकर्त्यांना पाटील यांनी एकप्रकारे मैदान सोडल्यासारखे वाटत आहे. 

वाचा : गुजरात - भाजपच्या बालेकिल्ल्यात 'आप'ची एन्ट्री