Wed, May 19, 2021 04:33
सांगली : अधीक्षकांसह पोलिस उतरले रस्त्यावर

Last Updated: May 05 2021 2:24AM

सांगली : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा  संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू जाहीर झाला आहे. तर  बुधवारी मध्यरात्रीपासून   कडक लॉकडाऊनचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर  पोलिस अधीक्षक  दीक्षित गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह सर्व पोलिस यंत्रणा आजपासून रस्त्यावर उतरली.  विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाईचा धडाका रात्री उशिरापर्यंत सुरू होता. कोणीही विनाकारण बाहेर पडू नका, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा  अधीक्षक गेडाम यांनी दिला आहे. 

गेडाम म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू  केले  आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिस दल आता आक्रमक भूमिकेत आहे. पोलिसांना कारवाईला भाग पाडू नये, यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे योग्य ते पालन केले पाहिजे.   विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. 

ते म्हणाले,अत्यावश्यक कामांना जाणार्‍यांना पोलिस दलाकडून कोणतीही अडवणूक केली जाणार नाही.  वाढता संसर्ग टाळण्यासाठी सांगलीकरांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. तसेच परजिल्ह्यातून येणार्‍यांकडे ई-पास गरजेचा आहे. त्याच्या तपासणीसाठी सर्व सीमाभागात चेकपोस्ट  आहेत.   जिल्ह्यात 53 ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत आहे. 

ते म्हणाले, जिल्ह्यात  गेल्या महिन्याभरात 11 हजार 940 दुचाकींवर कारवाई  करून 40 लाख 21 हजारांचा, 3590 चारचाकी वाहनांकडून 10 लाख 89 हजारांचा आणि विनामास्क फिरणार्‍या 3557 जणांकडून 16 लाख 25 हजार रुपये दंड वसूल केला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या 364 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 358 खटले दाखल  केले आहेत.