Sat, Aug 15, 2020 12:36होमपेज › Sangli › विरोधकांचा प्रचार जातीय; माझी लढाई मात्र विकासकामांवर  

विरोधकांचा प्रचार जातीय; माझी लढाई मात्र विकासकामांवर  

Published On: Apr 20 2019 1:54AM | Last Updated: Apr 19 2019 8:42PM
सांगली : प्रतिनिधी

पाच वर्षांत 30 हजार कोटींपेक्षा अधिक विकासकामांचा लेखाजोखा घेऊन मी निवडणूक लढत आहे. पण विरोधकांकडून जिल्ह्यात कधी नव्हे एवढा दर्जाहीन जातीय प्रचार सुरू आहे. खालच्या पातळीवर टीकेची आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ही संस्कृती नव्हे. जातीय विषवल्लीने समाज बिघडेल. त्यामुळे समाजच या निवडणुकीत विकासकामे आणि संस्कृतीहीन राजकारणाचा हिशेब करून निर्णय करेल, असे मत महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले. 

प्रश्‍न : टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना एआयबीपीतून बाहेर काढून संजय पाटील यांनी नुकसान केले, असा आरोप होत आहे.
संजय पाटील  - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कोट्यवधी रुपये खर्र्चूनही टेंभू-ताकारी-म्हैसाळ पाणी योजना अपूर्णच होत्या. पण गेल्या पाच वर्षांत या योजनांसाठी अनुशेषाबाहेर जाऊन केंद्राकडून प्रधानमंत्री सिंचन योजनेतून 2092 कोटी रुपयांचा निधी आणला. त्याद्वारे दुष्काळी सर्व तालुक्यांच्या गावांच्या शिवारात पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचले आहे. काही ठिकाणी ते अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याचे उद्घाटन होईल. जतच्या त्या 65 गावांनाही म्हैसाळ योजनेच्या चौथ्या टप्प्यातून पाणी देण्यासाठी योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. निवडणुकीनंतर त्याचा मुहूर्त होईल. एकूणच गेल्या पाच वर्षांत दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनक्षमता वाढविली आहे. चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले. त्यामुळे काँक्रिटचे महामार्ग होतील. रेल्वेने पुण्याला जायला पाच-सहा तास लागत होते. पण मी दुहेरी रेल्वेमार्ग, विद्युतीकरण काम केले. त्यामुळे हे काम झाल्यावर अवघ्या अडीच-तीन तासात पुण्याला पोहोचू शकतो. त्यामुळे औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टसाठी दोन-अडीचशे एकर जागा लागेल. त्याच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसह कृषी विकासाला चालना मिळेल. 

प्रश्‍न : खालच्या पातळीवर टीका होऊनही तुम्ही गप्प का? 
संजय पाटील -  हे काही मला नवीन नाही. हा राजकारणातील पूर्वीचा आर. आर. पाटील पॅटर्न आहे. आयुष्यभर मला गुंड ठरवून बदनामीचा प्रयत्न केला. आताही विरोधक तोच उद्योग करीत आहेत. पण जनतेला संजय पाटील काय आहे हे 30 वर्षांत चांगले माहीत आहे. विरोधकांचे कर्तृत्व आणि त्यांची पात्रता हेसुद्धा जनतेला माहीत आहे. त्यामुळे जनता योग्य तो निर्णय करेल. 

प्रश्‍न - मोदी विरोधी लाटेचा तोटा होईल का? 
संजय पाटील - गेल्या 2014 मध्ये देशात नरेंद्र मोदी यांची परिवर्तनाची लाट होती. परंतु गेल्या पाच वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांची लाट सुरू आहे. सुरक्षा, विकास, गोरगरीबांना सोयी-सुविधा याबद्दल केलेल्या कामांमुळे जनता खूश आहे. त्यामुळे आता मोदीविरोधी लाट नव्हे तर मोदींच्या विकासाचीच लाट आहे. त्याचा फायदाच होईल. 

प्रश्‍न : धनगर, मराठा आरक्षण, गोपीचंद पडळकर यांच्या मतविभागणीमुळे तोटा होईल का? 
संजय पाटील - धनगर, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेवढ्या चांगल्या पद्धतीने मार्गी लावला आहे तेवढा कोणीच नाही. आरक्षणाचा निर्णय झाला नसला तरी राजकारणात सोडून इतर सर्वच क्षेत्रात त्याचा लाभ देण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे सर्व समाज पाठीशीच राहील. जातीयवादाचा तोटा नाकारता येणार नाही. पण विकासकामांमुळे मागील निवडणुकीएवढे मताधिक्य मिळेलच.

प्रश्‍न : क्षारपड जमिनीचा प्रश्‍न गंभीर आहे
संजय पाटील -  पूर्वी  क्षारपड जमीन सुधारणेसाठी फार कमी पैसे येत.  मात्र आता क्षारपड जमीन  प्रश्‍न गांभिर्याने घेतला आहे. या प्रश्‍नाबाबत अभ्यासपूर्ण अहवाल तयार झाला आहे. त्यानुसार आता उपाययोजना होतील.

प्रश्‍न : तुमची लढाई कोणाशी आहे?
संजय पाटील -  विकासकामांच्या जोरावर मी सध्या प्रचार आणि पाठबळात     नंबर वन आहे. त्यामुळे दोन किंवा तिसर्‍या क्रमांकावर कोण हे मला माहीत नाही.

तर मी राजकारण सोडून देईन

संजय पाटील कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या खोट्या घोषणा करीत आहेत. पाणी योजनांसाठी पाच वर्षांत फक्त 74 कोटी रुपये आले, असा विरोधक आरोप करीत आहेत. याबद्दल विचारता ते म्हणाले, विशाल पाटील यांनी म्हैसाळ योजना कोठे आहे? त्याची दोन पंपहाऊस कोठे आहेत ते सांगावे, मी राजकारण सोडतो. गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्चून विकासकामे झाली ते जनतेला माहीत आहे. पण खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने ही कामे पूर्वीच झाली, आमच्याच काळात मंजुरी झाली होती अशा  अफवा पसरवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे.