Wed, Jun 23, 2021 02:11
तासगावात तरुणाचा खून

Last Updated: Jun 11 2021 2:49AM

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

तासगाव - भिलवडी रस्त्याशेजारील विहिरीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेल्या अवस्थेत  तरंगताना आढळला. या तरुणाचा अज्ञातांनी निर्घृणपणे खून केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

तासगाव-भिलवडी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोरील विहिरीत प्लास्टिकच्या कागदात बांधलेला मृतदेह तरंगत असल्याची माहिती तासगाव पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक  झाडे, उपनिरीक्षक पंकज पवार   सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. 

मृतदेहावर अनेक  जखमा आढळल्या.  डोक्यात जाड वस्तूने मारल्याचेही निदर्शनास आले. तरुणाचा चेहराही रक्ताने माखलेला  होता.  त्यामुळे हा खूनच असल्याचे पोलिसांनी  सांगितले. खुनाची ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असावी. या तरुणाला कुठेतरी अन्यत्र ठार मारून या विहिरीत आणून फेकले असावे, असाही अंदाज  पोलिसांनी व्यक्त केला.

राखाडी रंगाचा टी  शर्ट, काळ्या रंगाची  पँट, फ्रेंचकट दाढी आणि अंदाजे 25ते 30 वर्षे वय असे त्याचे वर्णन आहे. या वर्णनाची व्यक्ती बेपत्ता असल्यास संबधितांनी तासगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.