Wed, Jun 23, 2021 01:06होमपेज › Sangli › लाखो हेक्टर क्षेत्र राज्य सरकारमुळेच सिंचनाखाली

लाखो हेक्टर क्षेत्र राज्य सरकारमुळेच सिंचनाखाली

Published On: Sep 17 2019 1:58AM | Last Updated: Sep 16 2019 11:12PM

तासगाव ः येथे भाजपाच्या महाजनादेश यात्रेत नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेजारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, अजितराव घोरपडे व अन्य.तासगाव : शहर प्रतिनिधी
पश्‍चिम महाराष्ट्रात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांना पंचवीस वर्षात पैसे मिळाले नाहीत मात्र खासदार संजय पाटील यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद दिल्यानंतर गेल्या पाच वर्षात हजारो कोटींचा निधी आणून लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

महाजनादेश यात्रा तासगाव येथे आल्यानंतर ते स्वागत सभेत बोलत होते. यावेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, काँग्रेस - राष्ट्रवादीने गेल्या पंधरा वर्षात केलेले काम आणि भाजपने गेल्या पाच वर्षात केलेले काम यांची तुलना केली तर विकास नेमका कोणी केला, हे सिध्द होईलच.पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांना पंचवीस वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पैसे मिळाले नाहीत. गेल्या पाच वर्षात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी आपण दिला आहे.

राज्यात रस्त्यांची कामे, पाणी योजनांची कामे अतिशय वेगात सुरू आहेत. याचा परिणाम असा की, भाजप सरकारवर गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. 

 खासदार पाटील म्हणाले, सरकारने गेल्या पाच वर्षात विकासाचा उच्चांकी आलेख गाठला आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून त्यांनी विकासाची गंगा घरोघरी पोहोचवल्याची मांडणी करण्यासाठी मुख्यमंत्री  राज्यभर फिरत आहेत.यावेळी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, उपनगराध्यक्षा दिपाली पाटील, पक्षप्रतोद अनिल कुत्ते, नगरसेवक जाफर मुजावर, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय रेंदाळकर, किशोर गायकवाड, संतोष बेले, अविनाश पाटील, सुखदेव पाटील उपस्थित होते.

अजितराव घोरपडे यांच्या उमेदवारीचे संकेत

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात तर आपले सरकार पुन्हा येणारच आहे, मात्र तुमच्या तासगावचे सरकार या सरकारमध्ये असणार का, असा सवाल विचारला. यावर उपस्थित लोकांनी ‘हो’ म्हणून दाद दिली. यामुळे अजितराव घोरपडे यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांनी संकेत दिल्याची चर्चा सुरू होती.