Tue, Mar 02, 2021 09:17
आम्ही भाजपला करून दाखवले : पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील 

Last Updated: Feb 24 2021 2:32AM

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

भाजपच्या अडीच वर्षांतील कारभाला जनता वैतागली होती. त्यामुळे  महाविकास आघाडीने भाजपची सत्ता उलथून टाकली आहे. त्यांना आम्ही करून दाखवलं आहे, असा टोला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत  लगावला.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, काँग्रेसचे अय्याज नायकवडी, नगरसेविका वहिदा नायकवडी, शिवसेनेचे दिगंबर जाधव  उपस्थित होते.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजपच्या कारभाला जनता वैतागली होती. गेल्या अडीच वर्षांत त्यांना महापालिका क्षेत्रात एकही दाखवण्यासारखे काम करता आले नाही.  आता महाविकास आघाडीकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्या आम्ही पूर्ण करू.

विशाल पाटील म्हणाले,  भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादीमधील आयते नगरसेवक फोडून सत्ता स्थापन केली होती.   नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाजपने नगरसेवकांना डांबून ठेवून मतदान करून घेतले आहे. आमच्या संपर्कात आणखी काही नगरसेवक असून आगामी काळात ते महाविकास आघाडीत सामील होतील.

संजय बजाज म्हणाले, वेळ आली आहे, करेक्ट कार्यक्रम करायचा आहे, असा पालकमंत्री जयंत पाटील यांचा आदेश होता. काही दिवसांत महाविकास आघाडीतील नगरसेवकांची संख्या  50 होईल. 

सुरेश पाटील म्हणाले, भाजपच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले होते. भाजपने अडीच वर्षात काय काम केले ते सांगावे.  आता आम्ही किती विकास कामे करतो तेही पहावेे.

नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेत गेल्या अडीच वर्षात हुकुमशाही   होती. तोंडे पाहून कामे दिली जात असल्याचा भाजपच्याच नगरसेवकांचा आरोप आहे. भाजपचे नाराज  नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यांना देखील आम्ही आमच्या सोबत घेऊ . शेरीनाला, ड्रेनेजची कामे रखडली आहेत. तसेच घनकचरा प्रकल्प आणि  एलईडी बल्ब प्रकल्प देखील लवकरच पूर्ण करू.

अन्य पदांचाही फॉर्म्युला ठरला...

विशाल पाटील म्हणाले, महापालिकेतील अन्य पदांबाबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला आहे. जयंत पाटील आणि  नाना पटोले यांच्याकडे हा फॉर्म्युला पाठविण्यात येणार आहे. दोन्ही पक्षाध्यक्षांच्या सहमतीनंतर पदांचे वाटप करण्यात येणार आहे.