सांगली : पुढारी वृत्तसेवा,
अनिकेत कोथळे पोलिस लॉकऑपमधून पळून गेला होता अशी माहिती मला पहिल्या दिवशी मिळाली होती. नंतर दुसर्या दिवशी त्याचा घातपात झाल्याचे मला समजले अशी साक्ष सांगलीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी न्यायायलयात दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर होणार आहे.
सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व त्यांना सहायक म्हणून जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. बचावपक्षातर्फे अॅड. के. सी. शिरगुप्पे व अॅड. विकास पाटील यांनी उलट तपास घेतला. आज अॅड. प्रमोद सुतार, अॅड. सी. डी. माने व अॅड. गिरीष तपकिरे हे दीपाली काळे यांचा उलट तपास घेणार आहेत.
दीपाली काळे म्हणाल्या की, घटनेच्या दिवशी त कोथळे व त्याचा साथीदार पोलिस लॉकअपमधून पळून गेल्याचे मला अन्य पोलिसांकडून समजले. त्यादिवशी मी नाईट राऊंडसाठी सांगली शहर पोलिस ठाण्याला गेले होते. त्यावेळी मला ते दोघे पळून गेल्याचे तत्कालीनउपनिरीक्षक युवराज कामटे यांच्याकडून समजले.
त्यानंतर मी सर्व पोलिस स्टाफ ला शहराची नाकेबंदी करण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक रविंद्र डोंगरे, उपनिरीक्षक चव्हाण, युवराज कामटे यांच्यासह पोलिस अधिकार्यांनी सांगली शहराची नाकेबंदी केली. दुसर्या दिवशी मला समजले की, कोथळे याचा घातपात झाला आहे. तशा स्वरूपाची बातमी व माहिती प्रसारमाध्यमांना दिली. उलट तपासात दीपाली काळे काही काळ गोंधळल्या व काही प्रश्नांची उत्तरे आठवत नसल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांना सांगितले. काही काळ त्यांनी मोबाईलमधील माहिती पाहूनन साक्ष देण्याचा प्रयत्न केला.
कोथळे व त्यांच्या साथीदाराला सांगली शहर पोलिसांनी लूटमारीच्या प्रकरणी अटक केली होती. न्यायालयाने त्या दोघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीत असताना उपनिरीक्षक कामटे, हवालदार अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेलवाले यांनी कोेथळे याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर केला होता. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता, असा आरोप आहे.