Mon, Aug 10, 2020 20:48होमपेज › Sangli › गुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक

गुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 06 2018 12:55AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील गणेशनगर येथे खंडणी न दिल्याने एकावर तलवारीने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात गुंड बाळू भोकरेसह तीन संशयित अद्यापही पसार आहेत. शुक्रवारी रात्री गुंडा विरोधी पथकाने गणेशनगर येथे छापा टाकून भोकरेच्या धीरज दिलीप आयरे ( वय 20, रा. गणेशनगर) या भाच्याला अटक केली. खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून तो पसार होता. त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

दि. 5 मार्च रोजी मिलिंद चिनके याने पन्नास हजारांची खंडणी न दिल्याने  बाळू भोकरेसह त्याच्या साथीदारांनी मिलींदवर तलवारीने खुनी हल्ला केला होता. त्यावेळी त्याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून त्याला धमकावण्यातही आले होते. 

ही घटना घडल्यानंतर यातील एक संशयित धीरज कोळेकर याला अटक करण्यात आली होती. मात्र गुंड भोकरेसह धीरज आयरे, अक्षय शिंदे पसार झाले होते. शुक्रवारी रात्री पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन राबविले होते. त्यावेळी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके यांना धीरज आयरे गणेशनगर येथे आल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.