Sat, Aug 15, 2020 12:42होमपेज › Sangli › जिल्हा परिषद भरती अर्जास २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

जिल्हा परिषद भरती अर्जास २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Published On: Apr 17 2019 2:12AM | Last Updated: Apr 16 2019 10:57PM
सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मंगळवारी (दि. 16 एप्रिल) अंतिम मुदत होती. मात्र, शासनाच्या ई-महापरीक्षा पोर्टलचा सर्व्हर गेले तीन-चारा दिवसांपासून ‘डाऊन’ होता. मंगळवारी तर दुपारपर्यंत रजिस्ट्रेशन पोर्टल बंद होते. अखेर ग्रामविकास विभागाने ऑनलाईन अर्ज करण्यास दि. 23 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सांगली जिल्हा परिषदेकडील विविध पदांच्या 471 जागांसाठी शासनस्तरावरून ऑनलाई भरती होणार आहे. 

राज्यातील जिल्हा परिषदांकडील  कर्मचारी भरतीसाठी राज्यस्तरावरून शासनाच्या महाआयटी सेलकडून ऑनलाईन भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि. 26 मार्च ते 16 एप्रिलपर्यंत होता. अनेक विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरणे शिल्लक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामविकास विभागाने अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता दि. 23 एप्रिलच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. 

शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका

ऑनलाईन अर्ज भरण्यास यापुढे कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ दिली जाणार नाही. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत आणि कोणत्याही कारणासाठी शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नये, असे आवाहन ग्रामविकास विभागाचे उपसचिव गिरीश भालेराव यांनी केले आहे. 

शेवटच्या दिवशी घोर निराशा अन् दिलासा

ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात ई-महापरीक्षा पोर्टल बंद होते. गेले तीन-चार दिवस ‘सर्व्हर डाऊन’मुळे अनेक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता आला नाही. मंगळवारी (दि. 16 एप्रिल) ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. सकाळपासून नेटकॅफेवर उमेदवारांची गर्दी होती. मात्र, अर्ज भरण्याचे रजिस्ट्रेशन पोर्टलच बंद होते. मंगळवारी विजेचे भारनियमन असल्याने उमेदवारांच्या अडचणींमध्ये भर पडली. दरम्यान, दुपारनंतर ग्रामविकास विभागाने ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. 23 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याचे ‘मेल’ जिल्हा परिषदेला मिळाला आणि ई-महापरीक्षेच्या पोर्टलवरही हा मेसेज झळकला. त्यामुळे अर्ज न भरू शकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला. 

सांगली : ४७१ जागा

सांगली जिल्हा परिषद : कनिष्ठ अभियंता- 8, कनिष्ठ अभियंता ग्रा.पा.पु.- 5, कंत्राटी ग्रामसेवक- 7, औषध निर्माण अधिकारी- 11, आरोग्य पर्यवेक्षक- 3, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 1, आरोग्य सेवक पुरूष- 7, आरोग्य सेवक पुरूष (हंगामी फवारणी कर्मचार्‍यांमधून)- 166, आरोग्य सेवक महिला- 239, विस्तार अधिकारी कृषी- 1, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- 16, अंगणवाडी पर्यवेक्षिका-6, विस्तार अधिकारी सांख्यिकी- 1.