Fri, Feb 26, 2021 06:17
गद्दार नगरसेवकांवर अपात्रता कारवाई होणार : दीपक शिंदे

Last Updated: Feb 24 2021 2:32AM

सांगली : पुढारी वृत्तसेवा

भाजपच्या गद्दार नगरसेवकांवर अपात्रता कारवाईसाठी कायदेशीर बाबींचा अवलंब केला जाणार आहे. ‘त्या’ 7 नगरसेवकांनी भाजपशी व जनतेशी प्रतारणा केली आहे, अशी टीका भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी केली. महापालिकेतील भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनीही अपात्रता कारवाईसाठी तातडीने पावले उचलली जातील, असे सांगितले. 

शिंदे म्हणाले, भाजपच्या 4 व 1 सहयोगी नगरसेवकाने ‘व्हीप’ डावलून  ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या उमेदवारांना मतदान केले आहे. अनुपस्थित राहिलेल्या 2 नगरसेवकांनीही व्हीप डावलला आहे. कायदेशीर सल्लामसलत करून संबंधितांवर अपात्रता कारवाई करण्यासाठी तातडीने पावले उचलली जाणार आहेत. 

भाजपच्या चिन्हावर निवडून येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मतदान करणे हे जनतेशी आणि पक्षाशीही प्रतारणा करणारे आहे. ही चूक क्षम्य नाही. जनता त्यांना वेळ आल्यानंतर जागा दाखवून देईल. पक्षही त्यांच्यावर निश्चितपण कारवाई करणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. 

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे महापौर, उपमहापौर झाले असले तरी महत्वाची असलेल्या स्थायी समिती सभेत भाजपचा सभापती आहे. अन्य समित्यांवरही भाजपचे वर्चस्व आहे. महापालिकेत गैरप्रकार, चुकीचे ठराव घुसडण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून झाल्यास भाजपतर्फे त्याला विरोध केला जाईल. गैरकारभार करू दिला जाणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.