Wed, Jun 23, 2021 01:49होमपेज › Sangli › जिल्ह्यात ९४२ गुन्हेगार ‘वॉन्टेड’

जिल्ह्यात ९४२ गुन्हेगार ‘वॉन्टेड’

Published On: Jun 10 2019 1:36AM | Last Updated: Jun 09 2019 8:39PM
सांगली : संजय खंबाळे

खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल  असलेले जिल्ह्यातील 1 हजार 141 संशयित आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून फरारी आहेत. आरोपींना पकडण्याची मोहीम राबविली जात असली तर ‘वॉन्टेड’ आणि ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपींची यादी  कधीच कमी झालेली नाही. गुन्ह्यांचा जसा आलेख वाढेल तशी फरारी गुन्हेगारांची यादीही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या जिल्ह्यात  942 गुन्हेगार ‘वॉन्टेड’, तर 199 ‘मोस्ट वॉन्टेड’ आहेत.

न्यायालयाने 199 गुन्हेगारांना ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हणून  घोषित केले आहे. हे गुन्हेगार कुठे आहेत? याची पोलिसांना कल्पनाही नाही. केवळ त्यांचे नाव व पत्ता यादीत आहे. ते जिथे राहत होते, तिथे पोलिस अनेकदा धडकून आले आहेत. 1972 पासून काही गुन्हेगार फरारी आहेत. ते आज जिवंत आहेत का नाही, हेही पोलिसांना माहीत नाही. फरारी गुन्हेगारांना पडण्याची मोहीम सातत्याने सुरू असते. 
या मोहिमेंतर्गत गेल्या वर्षभरात 36 गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना  यश आले आहे.  गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या वेळच्यावेळी आवळणे गरजेचे असते. यामुळे त्यांच्यावर  कायद्याचा धाकही राहतो. 

फाळकूटदादांची दहशत

गेल्या काही दिवसांपासून गल्लीबोळात फाळकूटदादांची संख्या, त्यांची दहशत वाढत चालली आहे. स्वत:ला ते ‘दादा’, ‘भाई’, ‘अण्णा’, ‘भाऊ’   असे म्हणून घेऊन पडद्याआड राहून गुन्ह्यांची मालिका रचत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीत नेहमीच चढ-उतार राहिला आहे. जिल्ह्यात लोकसंख्येच्या  तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. तरीही पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवणे, गुन्हेगारीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असतात. या फाळकूटदादांचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्याभरात विविध गुन्हे दाखल असलेले जवळपास 942 आरोपींचा शोध  पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र यातील अनेक आरोपीं पोलिसांच्या नजरा चुकवून रात्रीच्यावेळी त्यांच्या मूळ निवासी येत असल्याचे  बोलले जात आहे.

पाहिजे व फरारी आरोपी पकडण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात व जिल्हास्तरीय पथक तयार करण्यात आले आहे. पथकाकडून आरोपींची शोधमोहीम सुरू आहे. जे पाहिजे आरोपी आहेत, त्यांना फरारी घोषित करण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्यानंतर फरारी आरोपींचा जाहीरनामा काढून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.
- श्रीकांत पिंगळे
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग