Wed, May 19, 2021 05:35
ब्लॉग : आई..., तू ग्रेट आहेस...

Last Updated: May 04 2021 9:01AM

बऱ्याच वर्षांनी त्याचा फोन आला. त्याचा म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यापासून ते पालक संघापर्यंत अन् अग्निहोत्रापासून ते आपल्या टुरिस्ट व्यवसायापर्यंतच्या अनेकविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मंगेश गुप्तेचा. बातमीदार नात्यानं त्याच्याशी कार्यकर्ता म्हणून जवळीक झाली अन् त्याच्या मृदू स्वभावाने ती आणखीच वाढली होती. मात्र, बराच काळ त्याच्याशी फोनवरचा संपर्कही थांबला होता. 'पुढारी'मध्ये मी रूजू झालो अन्‌ काही महिन्यांनी त्याचा फोन वाजला...

''अहो, तुम्ही आता पुढारीत आहात का ? माझ्या आईनं तुमचा लेख वाचला, म्हणाली 'मला बोलायचयं त्यांच्याशी.' मी म्हटलं 'माझ्या ओळखीचे माळी हेच आहेत का ते विचारतो.' मी वाळुंजकरांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही इथं आलात म्हणून. आईचा फोन आला तर चालेल का ?...'' 

''अरे असं काय करतोस, मंगेश...? सांग आईंना फोन करायला...'' त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फोन वाजला...''मी ललिता गुप्ते बोलतेय... मंगेशची आई...'' असं म्हणून त्या बोलू लागल्या. लेख आवडल्याचं सांगितलंच, पण त्याही पुढे जाऊन त्या बोलू लागल्या, अखंड, झऱ्यासारख्या... त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं... अनेक पिढ्या घडवल्या... लिहिण्याची त्यांना आवड... त्यातनं त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली... अध्यात्माचा पिंड असल्यानं गुरूकृपा झालेली... त्यामुळं हातून बरंच-बरंच काही घडत गेलं... त्या सांगत गेल्या... त्यांचं वय फक्त पंचाऐंशी... आताच एक पुस्तक हातावेगळं केलं ते सांगू लागल्या... मग म्हणाल्या, ''पुढारीचं अध्यक्षपद आता योगेश जाधवांकडं गेल्याचं वाचलं मी तुमच्या पेपरात. योगेशला मी पत्र लिहिलंय अभिनंदनाचं... ते तुला द्यायचंय. योगेशला दे आणि मला ते देतानाचा फोटो पाठव.'' मी त्यांच्या त्या उत्साहानं भारावलो. ''आई, तुमच्याकडं यायचंय मला. तुम्हाला भेटायला मला आवडेल.'' 

मंगेशनं मग त्यांचा पत्ता पाठवला, ए-५, रक्षालेखा सोसायटी, दत्तवाडी. मी पोहोचलो तर मंगेश बिल्डिंगबाहेरच वाट पाहात उभा होता. ठेवलेली दाढी, गोरापान, घारे-बोलके-हसरे डोळे अन चेहऱ्यावर प्रसन्नता. आत गेलो, आईंच्या पाया पडलो... अन तब्बल दोन तासांची मैफल रंगली. त्या बोलत होत्या, त्यांच्या आयु्ष्याचा पट उलगडत होत्या, मध्येच फोटो-पुस्तकं दाखवत होत्या, काही पुस्तकं मला भेट म्हणून देत असल्याचं सांगत होत्या. ''मी माझ्या आयुष्यावर पहिल्यांदा हिंदी पुस्तक लिहिलं, त्याचं मराठी भाषांतर आताच पूर्ण झालंय... आठवणींच्या हिंदोळ्यावर... ते आता डीटीपीला पाठवलंय... त्याचं प्रकाशन करायचंय...'' झरा फुफुांडत वाहात होतो आणि मी न्हाऊन गेलो होतो. शेजारी मंगेश बसला होता... त्याला म्हटलं, ''तुला कुठं जायचं असेल तर जा, मला थोडा वेळ आईशी बोलायचंय...'' त्या वेळेचा फायदा असा झाला की ललिता आई म्हणजे ललिताई मला 'अरे'  म्हणून हाक मारू लागली अन मी तिला 'ए आई...' अशी... त्यानंतर मंगेश एक-दोनदा ऑफिसात आला, मला म्हणू लागला, ''तुम्हाला एवढं काम असतं अन माझी आई तुम्हाला सतत फोन करून त्रास देत असते...'' मी ठणकावलं... ''मंगेश, ती फक्त तुझी आई राहिलेली नाही, ती माझीही आई झालीये... आणि आईचा मला काहीच त्रास होत नाहीये...'' तिच्या सातत्यानं उत्साही-काऱ्यरत असण्याबाबत, लख्ख असलेल्या स्मरणशक्तीबाबत मग तो कौतुकानं बोलू लागला. ... ललिताईंचे फोन अधूनमधून यायचे... 'ऐक तू...' असं म्हणून ती बोलू लागायची... खूप बरं वाटायचं... 

आणि २ मे च्या सकाळी बाळासाहेब अनासकरांचा फोन आला... ''मंगेश गुप्ते व्हेंटिलेटरवर आहे...'' ''बापरे... कसा आहे ?''

बाळासाहेब त्याची माहिती सांगत होते आणि माझ्या डोळ्यांपुढे फक्त ललिताई दिसत होती... 

... रात्री वाळुंजकरांचा मेसेज वाचला... मंगेश गुप्ते गेले...

... आता ललिताईंना फोन कसा करायचा ? मी ठरवलं, दोन दिवसांनी फोन करू अन नंतर जाऊनही येऊ...

... पण सोमवारी सकाळी फोन वाजला. त्यावर सेव्ह केलेले नाव होते आई मंगेश गुप्ते...

''सुनील, मंगेश गेला रे...''

मी खुर्चीवर बसलोच... ''आई, शांत हो...'' मला काय बोलायचं ते सुचलंच नाही.

''ऐक... तू घरी येऊन जा... अन अनासकरांनाही जमलं तर घेऊन ये...''

अनासकरांबरोबर मी रक्षालेखामध्ये पोचलो अन दारातून आत पाहिलं तर ललिताई काहीतरी लिहित होती. 

त्यानंतरचा तासभर ती बोलत होती आणि आम्ही मूकपणानं ऐकत होतो...

''मंगेशला पहिल्यांदा मी एसएसपीएमएस शाळेत घातलं, त्याला मी सायकलवरून सोडायला जायची... नंतर शाळा बदलल्या आणि ‌शेवटी माझ्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये आणलं...''

''मंगेश लहानपणापासूनच मोकळ्या स्वभावाचा... त्याचा मित्रपरिवार मोठा... त्याला गिटार वाजवायला आवडायचं...''

''आम्ही आधी स्वारगेट चौकात राहायचो... नंतर रक्षालेखामध्ये जवळज‌वळ फ्लँट घेतले... जवळच्याच बिल्डिंगमध्ये तो राहायचा...'' 

'' 'जननायक अटलजी' हे माझं पुस्तक त्यानं प्रकाशित केलं, आता महापालिकेच्या स्पर्धेसाठीही पाठवलं... पुण्यात बऱ्याच वर्षांपूर्वी अग्निहोत्राचा प्रसार करण्याचं काम त्यानं सुरू केलं... माझं 'आठवणींच्या हिंदोळ्यांवर' आत्मचरित्रही लवकर यावं, यासाठी तो धडपडत होता...'' 

''... मी मंगेशला म्हणायची, तू माझी हिरवळ आहेस... रोज मला भेटायला यायचा म्हणजे यायचाच. मला फार जपायचा. तो जाताना मी दार लावले आहे ना, याची खात्री करायचा...'' ''त्याच्या नातवाची मुंज या महिन्यात करायचं ठरवलं होतं, त्यासाठी काऱ्यालयही बुक केलं होतं...'' ''... दोन एप्रिलला तो आला नाही, मी फोन केला तर 'बरं नाही', असं म्हणाला. त्यानंतर चार-पाच दिवसांनी मला बिल्डिंगमधल्या कुणीतरी विचारलं, 'तुमच्या इथनं अँम्ब्युलन्स गेली का ? त्यात मंगेश बसल्याचं मी पाहिलं...' मला भेटल्याशिवाय तो कधीच गेला नव्हता, पण आता गेला... असा कसा गेला असेल ?...''

... आतापऱ्यंत खंबीरपणानं बोलत असलेल्या ललिताईचा स्वर कंप पावू लागला... तिच्या डोळ्यांत काहीतरी चमकलं... अश्रूच होते ते... ''आपल्या अश्रूंची किंमत जिथे असते तिथंच माणसानं रडावं. इतर वेळी बाकीच्यांचे अश्रू पुसावेत...'' ललिताई सांगत होती, पण डोळे अधिकच चमकू लागले... तिच्या अश्रूंची किंमत करणाऱ्या मोजक्या माणसांत तिनं अवघ्या एका भेटीत तिनं आमची गणना केली होती तर... टटमी कुणालाही भेटणार नव्हते आणि हे लिहून ठेवलं होतं,'' असं म्हणत तिनं एक कागद हाती दिला... 'मी कुणाशीही बोलणार नाही, माझी पोथी पुरी झाल्याशिवाय मी काहीच बोलणार नाहीये...' असं त्यावर लिहिलं होतं... ... तिनं मंगेशला लिहिलेलं पत्र तिनं माझ्या हाती दिलं... ते पत्र मंगळवारीच लिहिलं होतं, मंगेश गेला त्याच्या दुसऱ्याच दिवशी... 

प्रिय मंगेश...

नश्वर शरीर त्यागून तुझा अमर-चैतन्यमयी आत्मा वैश्वानर परमसद्गुरूंच्या सांगाती अज्ञात वाटेने जात आहे... चि. सौरभ, चि. प्रथमेश यांनी तुला दृष्टिसुख देऊन, परमानंद देऊन, अंतिम प्रवासासाठी शक्तिवर्धक पाथेय दिले आहे, खरं ना ?... तू भाग्यवान आहेस, माझी हिरवळ असलेला तू माझा निरोप न घेता जाऊच शकणार नाहीस, याची मला खात्री आहे. तू लवकरच परिवारात येणार आहेस, असं तुझंच आश्वासन आहे... 

- तुझी आई.

...  ''आता तुमच्या दोघांवर या पुस्तकाची जबाबदारी टाकते. त्यासाठी तो धडपडत होता... पुस्तकाचं काम झालं तर  त्याच्या आत्म्याला बरं वाटेल...'' ... ज्ञानेश्वरीचं पठण करणाऱ्या ललिताई त्यातील श्रीकृष्णानं शिकवलेली स्थितप्रज्ञता, ज्ञानयोग प्रत्यक्षात उतरवत होती... ... आम्ही निरोप घेऊन निघालो... घराच्या दारातून मागं वळून पाहिलं तर त्यांचा चेहरा निश्चयी दिसत होता अन अवचित तरळलेले अश्रू थांबले होते... मात्र ही विश्वात्मक वृत्ती पाहून दाटलेल्या आकाशानं आपले डोळे गाळण्यास सुरूवात केली होती... 

- सुनील माळी