Sun, Jan 17, 2021 11:21
पुण्याच्या वाट्याला कोरोना लसीचे एक लाख दहा हजार डोस

Last Updated: Jan 13 2021 12:29PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे पिंपरी-चिंचवड सह, पुणे ग्रामीण येथील पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी जिल्ह्याला केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १ लाख १० हजार डोस पुरवण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेसाठी ६० हजार, पिंपरी-चिंचवडसाठी १५ हजार आणि पुणे ग्रामीणसाठी ३६ हजार लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत.

मंगळवारी सिरम इन्स्टिट्यूटमधून राज्यसाठी ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी हे डोस सीरममधून पुण्याच्या मध्यवर्ती लस भांडार दाखल झालेत. येथून पूर्ण राज्याला त्याचे वितरण होणार आहे. दरम्यान, औंध येथील शीतकरण साखळीमध्ये पुणे आरोग्य परिमंडळातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे डोस ठेवण्यात येणार आहेत. बुधवारी मध्यवर्ती भांडार येथून औंध शीतकरण साखळीमध्ये घेऊन जाणार आहेत. औंध येथून पुणे जिल्हा, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच सोलापूर, सातारा जिल्ह्यासाठी लस वितरित केली जाईल. 

पुणे शहर, पिंपरी आणि जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची संख्या १ लाख १० हजार आहे. त्यांना लसीकरण करण्यासाठी आता प्रत्येकी एक डोस देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यातील लसीकरणासाठी २ लाख २० हजार डोसची आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यात ५५ ठिकाणी लसीकरण केंद्र असणार आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात २३ तर दोन्ही महानगरपालिकामध्ये प्रत्येकी १६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. आतापर्यंत जवळपास ९५ हजार कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केलेली आहे.