Thu, Oct 01, 2020 17:51होमपेज › Pune › निगडी-दापोडी ‘बीआरटी’ मार्गाचा बोजवारा

निगडी-दापोडी ‘बीआरटी’ मार्गाचा बोजवारा

Last Updated: Dec 15 2019 1:24AM
पिंपरी : प्रतिनिधी

बीआरटी मार्गाची दुरवस्था, मेट्रोच्या कामाचा अडथळा, मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी, वाहतूक कोंडी आणि नियोजनाअभावी कोलमडलेले बसचे वेळापत्रक या समस्यांमुळे प्रवाशांना बीआरटी मार्गातून कसाबसा प्रवास करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जुन्या पुणे-मुंबई मार्गातील ‘बीआरटी’ मार्गाचा बोजवारा उडाला. त्याचा फटका या मार्गाने प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांना बसत आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील सहा ते सात वर्षे रखडलेल्या या मार्गात 2018 मध्ये बस धावू लागली. मात्र, काही दिवसातच मेट्राचे सुरु झाल्यानंतर पुन्हा या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. दापोडीतून निगडीच्या दिशेने येताना 16, तर तेथून जाताना 16 असे 36 बस थांब्याचे नियोजन आहे. मात्र, त्यातील अनेक बसथांब्याची दूरवस्था झाली आहे.  जवळपास 12.50 किलोमीटरचा हा बीआरटी मार्ग आहे. मात्र, यात अनेक अडथळे असल्याने हेच अंतर पार करण्यासाठी बसला अर्धा ते पाऊण तास नियोजित वेळेपेक्षा अधिक घालावावा लागतो. त्यामुळ या मार्गातील बसचे नियोजन फसले असून, वेळापत्रकही कोलमडले आहे. मार्गात आठ चौक असल्याने या चौकातील कोंडी आणि अवैध वाहतूकीमुळे प्रवासात अनेक अडथळे येत असल्याचे बस चालक सांगतात.

दरम्यान, वल्लभनगर ते नाशिक फाटा रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने येथील बीआरटी मार्ग गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, येथे बस धावत नसल्याने या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तेथून पुढे मार्ग सुरू आहे. मात्र, पुन्हा निगडी  चिंचवड स्टेशन येथे मार्गात अडथळा निर्माण झााला आहे. पुढे निगडी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने बीआरटी मार्गाची दुरवस्था झाली आहे. कामामुळे रस्ता अगदीच चिंचोळा झाला असल्याने बसेस तेथे अडकून पडतात. 

बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी 

दापोडी ते निगडी मार्गात अन्य वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पीएमपीने तेथे वॉर्डन नेमलेत. त्यांच्या हातात दोरी असल्याने केवळ पीएमपीच्या बसेस तेथून सोडण्यात येतात. मात्र, अनेकवेळा ती दोरी तुटल्याने अथवा त्या वॉर्डनचे लक्ष चुकवून खासगी वाहने या मार्गात घुसतात. त्यात रिक्षा आणि दुचाकींचा सर्वाधिक समावेश आहे. एवढेच नाही, तर अनेक वेळा महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांचीही वाहने येथे शिरतात. 

वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी

शहरातील बसथांब्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी रिक्षा व वाहने उभी केली जातात. त्यामुळे अनेकदा बसचे प्रवासी नेत असल्याच्या तक्रारी बस वाहकांनी पीएमपीच्या वरिष्ठांकडे केल्या आहेत. दुसरीकडे, बसचे उत्पन्न कमी झाल्याने वाहकाला जबाबदार ठरवले जाते. त्यामुळे मार्गातील अडथळे व बसथांब्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे. 

पुण्यातील महाविद्यालयांना जाण्यासाठी पिंपरी चौकात बसची वाट पाहावी लागते. बस वेळेवर कधीच येत नाही. पुढे उशीर होत असल्याने खासगी वाहनांचा वापर करावा लागतो.  तसेच, बस अचानक बंद पडल्याने हाल होतात.     - रसिका हुलसुरे,  प्रवासी, पिंपरी 

 "