Fri, Sep 25, 2020 17:32होमपेज › Pune › बारामतीमध्ये सावकाराकडून महिलेचा विनयभंग

बारामतीमध्ये सावकाराकडून महिलेचा विनयभंग

Last Updated: Sep 16 2020 2:29PM
बारामती : पुढारी वृत्तसेवा

व्याजाने दिलेल्या पैशापोटी महिलेच्या घरात घुसत तिचा विनयभंग करत दुचाकी ओढून नेल्याप्रकरणी हनुमंत देवबा भागवत (रा. कुरुबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बारामतीतील आमराई भागात राहणाऱ्या महिलेने याबाबत फिर्याद दिली. ही महिला मूळची तांबेवाडी (ता. माळशिरस) येथील रहिवाशी आहे.

दि. 20 एप्रिल 2020 व 14 सप्टेंबर 2020 रोजी बारामतीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हनुमंतने 20 एप्रिल रोजी फिर्यादीच्या घरी येत तिच्या पतीला शेकडा 10 टक्के व्याजाने 15 हजार रुपयांची रक्कम दिली होती. ही रक्कम देताना एक महिन्याचे 1500 रुपयांचे व्याज काढून घेत 13500 रुपये देण्यात आले होते. फिर्यादीकडे वाईट हेतूने बघत तू माझ्याकडे गहाण रहा, असे बोलून तिलाही शेकडा 15 टक्के व्याजाने 15 हजारांची रक्कम दिली होती. त्यातील 2250 रुपये एक महिन्याच्या आगाऊ व्याजापोटी काढून घेत 12750 रुपये रोख दिले होते. 

त्यानंतर दि. 2 सप्टेंबर रोजी त्याने महिलेच्या घरी येत व्याजाने घेतलेल्या रकमेच्या बदल्यात 19 हजार रुपये रोख रक्कम वसूल केली होती. यावेळी आणखी 30 हजारांची मागणी त्याने केली. ती न दिल्याने तो दुचाकी घेवून जावू लागला. महिलेने त्याला अटकाव केला असता त्याने वाईट हेतूने हात पकडून तु पण माझ्या बरोबर चल, तुला माझ्या घरी गहाण ठेवतो अशी भाषा वापरत तिचा विनयभंग करत दुचाकी ओढून नेली. त्यानंतर दि. 14 रोजी त्याने पुन्हा येत माझे व्याजाचे पैसे लवकर दे नाही तर तुझ्यावर खोटी अॅट्राॅसिटीची केस दाखल करेन असे म्हणत स्वतःची दुचाकी (एमएच-45, एच-4016 ही फिर्यादीच्या घरापुढे लावली. तु पैसे देत नसशील तर नातेपूते पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात तुला अडकवतो असे म्हणत तो निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

 "