Wed, May 19, 2021 04:34होमपेज › Pune › व्हिलॉगिंग आणि ब्लॉगिंगकडे तरुणाईचा वाढता कल

व्हिलॉगिंग आणि ब्लॉगिंगकडे तरुणाईचा वाढता कल

Last Updated: Oct 29 2020 1:50AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या काळात इंटरनेटने अनेक देशांत लॉकडाऊन झाल्याने माणसांचा माणसांशी संपर्क तुटला. मात्र, इंटरनेटने संपूर्ण जगाला जोडून ठेवले. त्याद्वारे तरुणाईने कला सादर करण्याचे व्यासपीठ मिळविले. काहींनी या संधीचा फायदा घेत अर्थाजनही केले.  त्यामुळेच यू-ट्यूबवर व्हिलॉगर्सची (व्हिडिओ लॉगिंग) आणि फेसबुक-इन्स्टाग्रामवर ब्लॉगर्सची संख्या वाढली आहे. याच व्यासपीठाने तरुणांना हजारो नेटिझन्सशी जोडण्याची संधीही दिली आहे, अन्  पैसा कमाविण्यासाठीचा मार्गही दिला आहे.

फूड ब्लॉगिंग असो वा एखाद्या पर्यटनस्थळाची माहिती देण्यासाठी केलेले ब्लॉगिंग...जगभ्रमंतीची क्षणचित्रे यू-ट्यूबवरील व्हिलॉगिंगद्वारे मांडणे असो, वा पाककृतीची व्हिलॉगिंग...या माध्यमाने तरुण-तरुणींना व्यक्त होण्याचे अवकाश दिले आहे.  जागतिक इंटरनेट दिनानिमित्त गुरुवारी (दि.29) दै. ‘पुढारी’ने सोशल मीडियाद्वारे तरुण-तरुणींना मिळालेल्या करिअरच्या वाटेचा आढावा घेतला. सध्या नोकरदार आणि महाविद्यालयीन तरुणाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह आहेत. अनेकजण दैनंदिन जीवनातील छायाचित्रे, तसेच कोणी व्हिडिओ पोस्ट करतात....पण, यापलीकडे जाऊन काहीजणांनी सोशल मीडियाचा वेगळा उपयोग करीत इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर ब्लॉगिंग आणि यू-ट्यूबवर व्हिलॉगिंग सुरू केली. 

ब्लॉगिंगसंदर्भात म्हटले तर काही जणांचे कंपन्यांच्या संकेतस्थळावरील जाहिरातीसाठी लिखाणास प्रारंभ केला, तर कोणाचे व्हिडिओ बनवून पोस्ट करण्याचे काम सुरू केले. याशिवाय फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर होणार्‍या ब्लॉगिंगद्वारेही त्यांना पैसे कमाविण्यासाठी एक वाट मिळाली आहे. सध्या खाद्यपदार्थ, गिर्यारोहण, फिटनेस, लाईफस्टाईल आदी विषयांवर ब्लॉग तयार केले जात असून, त्याला मिळणार्‍या व्ह्युव्ज आणि जाहिरातीतून तरुणाईचे अर्थाजन होत आहे. खासकरून 20 ते 35 वयोगटांतील तरुण-तरुणींनी विविध कंपन्यांच्या संकेतस्थळांसाठी आणि स्वत:च्या वैयक्तिक फेसबुक-इन्स्टाग्राम पेजसाठी ब्लॉगिंग करताना दिसत आहेत.

प्रसन्न कुलकर्णी हा गेल्या काही वर्षांपासून व्हिलॉगिंग करीत आहे. तो विविध सामाजिक विषयांवर लघुपट तयार करून यू-ट्यूबवर अपलोड करतो.  प्रसन्न म्हणाला, सुरुवातीला अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईलद्वारे व्हि-लॉगिंग सुरू केली. हळूहळू आत्मविश्वास आल्याने डीएसएलआर कॅमेर्‍यातून हे काम सुरू केले. आता ते जमू लागले आहे. यू-ट्यूबवर अनेकजण आज अ‍ॅक्टिव्ह झाले असून, प्रत्येकजण नवे विषय मांडत आहेत. जाहिराती आणि व्ह्युव्जमधून अर्थाजन होते. पण, यातून आपला चाहता वर्गही निर्माण होत असल्याचा आनंद आहे.  

ऐश्वर्या शिवणे म्हणाली, गेल्या काही महिन्यांपासून मी फूड व्हिलॉगिंग करीत आहे. मी खाद्यपदार्थांचे वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करीत असते. त्याला चांगला प्रतिसाद आहे. माझ्या काही मैत्रिणीही व्हिलॉगिंग करतात. हे नवे दैनंदिन पोस्टपेक्षा काहीतरी हटके आणि वेगळे करावे म्हणून हा नवा पर्याय प्रत्येकीने स्वीकारला आहे. व्हिडिओ शूट करण्यासह त्याचे एडिटिंग आणि त्याला व्हाईस ओव्हरही तरुणीच देत असून, यामुळे त्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगती करीत आहेत. कॅमेर्‍यासमोर येऊन त्या स्वतः निवेदनही करतात. यातून आम्हा तरुणींसाठी एक व्यासपीठ निर्माण झाले आहे.