Sat, Aug 08, 2020 14:35होमपेज › Pune › मावळमध्ये पार्थ व बारणे यांच्यात अटीतटीची लढत

मावळमध्ये पार्थ व बारणे यांच्यात अटीतटीची लढत

Published On: Apr 13 2019 1:49AM | Last Updated: Apr 13 2019 1:49AM
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचारात वेगवेगळ्या युक्त्या वापरून आपले नाव चर्चेत ठेवले आहे. शेकापच्या, मनसेच्या पाठिंब्यामुळे व भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांच्या प्रवेशामुळेही पार्थ यांचे प्रथमदर्शनी सकारात्मक वातावरण झाले आहे. परंतु शिवसेना-भाजप युतीतर्फे खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर होऊन 17 दिवसांनंतर अखेर युतीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर खा. बारणे व भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे वाद मिटल्याचे चित्र असले तरी आणखी 15 दिवसांत पुलाखालून किती पाणी वाहून जाते, यावरच शिवसेनेच्या खा. बारणे यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.   

पार्थ यांच्या प्रचाराचा नारळ फोडून 24 दिवस झाले. परंतु शिवसेना-भाजप-आरपीआय (आठवले) महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या युतीचा प्रचार एकत्रितपणे अद्याप सुरू झालेला दिसत नाही. मावळातील राजकीय बलाबल पाहता शिवसेना-भाजप युतीची ताकद वाढलेली असली तरी त्यांच्यातील वादच अद्याप मिटलेले नाहीत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेतकरी कामगार पक्षाशी (शेकाप) रायगड जिल्ह्यात आघाडी करून बेरजेचे राजकारण केले आहे. मनसेनेही भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करा, असे सांगून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीलाच पाठिंबा दिलेला आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या नाराजीचा फायदा घेत त्यांचे पुत्र निहाल पानसरे यांना राष्ट्रवादीत घेण्यातही राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे. निहाल पानसरे यांच्या प्रवेशाचा मोठा फायदा पार्थ यांना पिंपरी-चिंचवडसह वडगाव मावळ, उरण, कर्जत व पनवेल या मतदारसंघांतही होणार आहे. केवळ अल्पसंख्याकच नव्हे; तर इतर समाजातही पानसरे यांना मानणारा वर्ग आहे. 

शेकापचे प्रदेश सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी (दि. 6) पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने मैदानात उतरणार आहे. शेकापचे प्राबल्य असलेल्या घाटाखालील तीनही विधानसभा मतदारसंघांतून पवार यांना मताधिक्याने निवडून आणणार, असे सांगितले. त्यामुळे घाटाखाली काहीशी कमी असलेली महाआघाडीची ताकद आपसूकच वाढली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व खासदार श्रीरंग बारणे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. 30 मार्च) व त्यानंतर भाजप नेते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि. 1 एप्रिल) मध्यस्थी करून शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोही असफल ठरला. त्यानंतर रविवारी व सोमवारी झालेल्या राजकीय खेळ्यानंतर महाजन यांची शिष्टाई व अनेकांच्या मध्यस्थीनंतर पहद्यामागे अनेक नाट्यमय घटना घडल्या. त्यानंतर खा. बारणे व आ. जगताप यांना रविवारी (दि. 7) वाकड येथील एका हॉटेलमध्ये एकत्र आणण्यात यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. उमेदवारी अर्ज भरताना भाजप व शिवसेनेमधील बेबनाव दिसू नये यासाठी दोनही पक्षांनी प्रयत्न केले. अखेर त्यास यश आले व सोमवारी (दि. 8) खा. बारणे व आ. जगताप यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आपसातील वाद मिटल्याचे जाहीर करण्यात आले. खा. बारणे यांनी, ‘भाजप व आ. जगताप यांच्यावर गैरसमजातून राजकीय आरोप केले असून ते सर्व मागे घेत आहे’, असे जाहीर केले. तर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून झालं गेलं विसरून बारणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, असेे  आ. जगताप यांनी जाहीर केले. त्यानुसार मंगळवारी (दि. 9) अर्ज दाखल करतानाही भाजप-शिवसेनेचे नेते एकत्र दिसले. 

शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व भाजपच्या नगरसेवकांनी यापूर्वी समन्वय बैठकीला पाठ फिरविली होती. सोमवारी (दि. 25 मार्च) भाजप नगरसेवकांनी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुन्हा नाराजीचा सूर आळवला होता. युतीच्या प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच मावळात युतीतील बेबनाव दिवसेंदिवस जास्तच गडद होत चालला होता. रविवार व सोमवारच्या  मनोमीलनाने युतीतील वातावरण निवळण्यास सुरुवात झाली असली तरी हे खालपर्यंत किती झिरपते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.  

‘शेकाप’ची घाटाखाली तीन विधानसभा मतदारसंघांत ताकद आहे.  घाटावर तीन विधानसभा मतदारसंघांतही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची घडी बसवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले जुने संबंध वापरून बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. अजित पवार यांनी 15 वर्षांपेक्षा अधिक काळ पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता भूषविली आहे. त्यामुळे ते आपल्या संबंधांचा पुरेपूर फायदा घेणार, यात शंका नाही. परंतु युतीमध्ये जर पदाधिकार्‍यांची व कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने नीट जुळली नाही तर त्याचा फायदा पार्थ यांच्यासाठी घेण्याचा प्रयत्न अजित पवार घेणार हेही निश्‍चित आहे. त्यादृष्टीने त्यांनी हालचालीही सुरू केल्या आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्याच नव्हे; तर भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांना अजित पवार यांचा चार-चार वेळा दूरध्वनी येऊन गेलेला आहे.