पुणे ः पुढारी वृत्तसेवा
कोंढव्यात नराधम पित्याने पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे सलग तीन वर्ष बापानेच ९ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. पित्याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार ४३ वर्षीय नराधम बापावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा फर्निचरचा व्यवसाय आहे. त्याला ४ मुली आहेत. दरम्यान यात दोन ९ वर्षांच्या मुली आहेत. २०१६ पासून आरोपी बाप या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता.
मात्र याबाबत कोणाला सांगितल्यास तो चारही मुलींना मारण्याची धमकी पत्नीला देत असे. त्यामुळे त्या भितीपोटी तक्रार देत नव्हत्या. हा प्रकार वकीलाला समजला. त्यानंतर त्यांनी पत्नीला धीर देत तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे आणले. त्यानंतर याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या बापाला अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चैत्राली गपाट करत आहेत. त्याला १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिला आहे.